रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गढूळ पाणी पुरवठा होत असून, या चिखल मिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे अलिबाग तालुका पं. स. सदस्य उदय काठे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष सुनिल दामले, रेवदंडा अर्बन बॅक संचालक सतिश लेले, नागाव भाजप कार्यकर्ते प्रसाद आठवले, शौकिन राणे, अमेय आठवले, सौरभ आपटे, अरविंद पाटील, समीर घरत, चिन्मय फडके आदी यावेळी उपस्थित होते.
उमटे धरणातून सुडकोळी, रामराज, वावे, चौल, रेवदंडा, नागाव परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या चार पाच महिन्यांपासून सदर धरणातून चिखल मिश्रीत पाणी पुरवठा होत आहे. या चिखिल मिश्रीत पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी 13 सप्टेबर 2019 रोजी नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा करण्याचे लेखी आदेश रायगड जिल्हा परिषदेला दिले आहेत. दरम्यान, या धरणावर सुमारे तीन कोटी रूपये खर्च करून फिल्ट्रेशन प्लान्ट बसविल्याचा दावा रायगड जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. मात्र आजही नागरिकांना चिखल मिश्रीत गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सततच्या माती मिश्रीत पाणी पुरवठ्याने परिरातील नागरिकांच्या भावना अतिशय संप्तत तसेच संवेदनशील आहेत. तरी या बाबतीत तातडीने योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी या निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.