
अलिबाग ः जिमाका
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे पोयनाड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. परिणामी मौजे पोयनाड येथील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलले घर व त्यालगतची 12 घरे तसेच त्यांचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहितेच्या (45 ऑफ 1860) कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
खोपोली नगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे तरुणाचा मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका क्षेत्रातील ताकई येथे वास्तव्यास असलेला 19 वर्षीय तरुणाचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारीच येथील लक्ष्मीनगर भागातील गगनगिरीनगरमधील एक 44 वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ताकईतील मृत तरुण क्षयरोगाने आजारी होता. दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत खालावल्याने त्याला येथील पार्वती हॉस्पिटल व नंतर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोरोना तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गगनगिरीनगर येथे वास्तव्यास असलेला व तळेगाव येथे नोकरीनिमित्त जात असलेल्या 44 वर्षीय व्यक्तीसही कोरोनाची लागण असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे खोपोली शहरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपालिका सर्व खबरदारी घेत असल्याचे सांगून शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहरातील जनतेला केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper