पेण : प्रतिनिधी
पेण शहरात चार दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर नगर परिषदेकडून शहर निर्जंतुकीकरण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुवारी (दि. 25) सकाळपासून शहराच्या विविध भागांमध्ये मशिनच्या सहाय्याने व माणसे लावून निर्जंतुकीकरणाला सुरुवात
झालेली आहे.
या निर्जंतुक फवारणीमध्ये मिलीथिऑन, फ्लायगॉन, निमटेक्स, सोडिअम हायपोक्लोराईड, लिंबाडा या कीटकनाशकांचा उपयोग केला जात आहे. या फवारणीमुळे पेणमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या साखळीला खंडित केले जाईल, असा विश्वास मुख्याधिकार्यांकडून व्यक्त करण्यात आला, तर बंदमुळे निर्जंतुकीकरणाला कोणतेच अडथळे येत नसल्याने ही मोहीम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख अंकिता इसाळ यांनी दिली.
लॉकडाऊन उठल्यानंतर महानगरातून स्थलांतरित झालेले अनेक जण पेणमध्ये आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच पेण शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची सतत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. या भागात निर्जंतुकीकरण करायला अनेक अडचणी येत होत्या, मात्र नव्याने आखण्यात आलेल्या आराखड्यानुसार कर्मचार्यांना निर्जंतुकीकरण करणे सोपे जात आहे व याचा फायदा होणार असल्याने जनतेने आभार मानले जात आहेत. दरम्यान, पेण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केले होते, तसेच गुरुवारी त्यांनी स्वतः बाजारपेठ व इतर भागांत फिरून 25 ते 28 जूनपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळाला.