पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांसाठी पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. अलिबाग जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
पनवेल येथे जिल्हा न्यायालयाची इमारत पूर्ण झाली असतानाही येथील जिल्हा न्यायालयाला शासनाच्या न्याय विभागाकडून मान्यता न मिळाल्याने जिल्हा न्यायालय सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत व खालापूर येथील नागरिकांना व वकिलांना न्यायालयीन कामकाजाकरिता अलिबागला जावे लागायचे. त्यामुळे वेळ व पैसे अधिक खर्ची होऊन नाहक त्रासही होत होता, ते टाळण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष केंद्रित करून मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन्यास मान्यता दिली होती. त्यानुसार 27 जुलै रोजी पनवेल येथील जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाले असून, त्याचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनावेळी जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायालय राजेश अस्मर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, वकील संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे, दर्शना भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालय तथा रायगड अलिबाग जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती रियाज छागला, जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे आणि वकील संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.