कर्जत : बातमीदार
कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या कार्यकारी समितीने मागील वर्षी इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र वर्षभर इमारत बांधण्यावरून न्यायालयीन लढाई सुरू होती. ती आता थांबली असून, व्यायामशाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात झाली आहे.
हुतात्मा कोतवाल व्यायामशाळेच्या पुनर्बांधणीच्या प्रस्ताव दीड वर्ष वादाच्या भोवर्यात सापडला होता. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याशिवाय या व्यायामशाळेच्या मैदानावर कुठलेही बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशा तक्रारी शासनदरबारी केल्या गेल्या होत्या, परंतु विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी मंडळाने व्यायामशाळा बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2 डिसेंबर 2019 रोजी संबंधित ठेकेदाराने मजुरांच्या आणि जेसीबी यंत्राच्या साहाय्याने या जागेवर बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदले गेले होते, मात्र त्या वेळी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींमुळे कर्जत नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पालिकेच्या वतीने नोटीस बजावून परवानगी रोखली होती.त्यानंतर मुख्यधिकारी कोकरे यांच्या लेखी आदेशान्वये रचना सहाय्यक लक्ष्मण माने यांनी हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा विश्वस्त मंडळाच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर विश्वस्त मंडळाने आपल्या वकिलांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली याचिका 6 डिसेंबर 2019 रोजी फेटाळून लावली होती. संबंधित कागदपत्रे कोतवाल व्यायाम मंडळाने कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना दाखविली. त्यांनी कागदपत्रांची तपासणी करून व्यायामशाळा नव्याने बांधण्यास सशर्त परवानगी आहे. त्यामुळे व्यायामशाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला अखेर सुरुवात झाली. नगरसेवक धनंजय दुर्गे यांच्या हस्ते नारळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेविका भारती पालकर, विशाखा जिनगरे यांच्यासह हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दुर्गे, सचिव शंकर भिंगारे, खजिनदार उदय मांदुस्कर, विश्वस्त शिवाजी भासे, सुनील दुर्गे, गणेश ढमाले, रमेश देशमुख, मोरेश्वर देशमुख, अविनाश बेडेकर, शशिकांत कडव आदी पदाधिकारी उपस्थित होते.