Breaking News

नवी मुंबईत घरोघरी मास स्क्रिनिंग; पन्नाशीच्या आतील शिक्षकांवर जबाबदारी

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई क्षेत्रात सध्या कोरोनाने कहर केला आहे. मात्र सध्या नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ब्रेक दि चेन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली असली तरी 42 कंटेन्मेंट झोनमध्ये घरोघरी स्क्रिनिंग करण्यास सुरुवात झाली आहे. या कामासाठी खासगी अनुदानित व नवी मुंबई महापालिकेतील शासन निर्णयानुसार 100 शिक्षकांवर  विभागनिहाय स्क्रिनिंगची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यानुसार आठ विभागनिहाय 50 वयाच्या आतील व कोणतेही आजार नसलेले  600 ते 800 शिक्षक सध्या स्क्रिनिंगचे काम करत आहेत. महापालिकेच्या शिक्षकांनी याआधी स्क्रिनिंगचे काम केले असल्याने सध्याच्या स्क्रिनिंगमध्ये खासगी अनुदानित शिक्षकांची संख्या जास्त आहे.

संपूर्ण नवी मुंबईकरांचीच घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्यात येते असून त्यांचे शारीरिक तापमान व शरीरातील प्राणवायु मोजला जात आहे. कुटुंबातील लहान बाळापासून ते वयोवृध्द नागरिकांची तपासणी करून त्यांची नाव नोंदणी, वय नोंदवले जात आहे. सध्या पालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे.त्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जात आहे. साथरोग कायद्यांतर्गत शिक्षकांना मास स्क्रिनिंगचे काम दिल्याचे बोलले जात आहे. शिक्षक देखील स्वतः जीव धोक्यात घालून ही तपासणी करत आहेत. मात्र यातील अनेक शिक्षक पीपीई किट न घालता, मास्क व हॅन्डग्लोज घालून स्क्रिनिंग करत असल्याचे आढळून आले आहे. प्राणवायू तपासताना ऑक्सिमिटरमध्ये संबंधित व्यक्तीचे बोट ठेवले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या तपासणीआधी व तपासणीनंतर हाताला  सॅनिटायजर लावून काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.  कोणतीही व्यक्तीत लक्षणे आढळल्यास अथवा तापमान जास्त असल्यास अथवा ऑक्सिजन लेव्हल कमी आढळल्याड तातडीने त्याबाबत पालिकेच्या अधिकार्‍यांना सांगून अँटिजेन टेस्ट केली जात आहे. एमएमआर क्षेत्रात एकाच दिवशी सर्वाधिक टेस्ट करून विक्रम प्रस्थापित केला आहे. अँटिजेंन टेस्टमुळे संसर्ग साखळी तोडण्यात वेळीच यश येत आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई शहरातील रिकव्हरी रेट देखील वाढला असून तो 66 टक्के झाला आहे.

शिक्षकांना विमाकवच कधी?

पालिका शिक्षण विभागातील ठोक मानधन प्राथमिक शिक्षकांची मास्क स्क्रिनिंगच्या कामासाठी विभाग कार्यालय येथे नेमणूक करण्यात आली आहे. या शिक्षकांना कोणताही विमाकवच किंवा सुरक्षा कवच दिले गेले नाही. या शिक्षकाला अथवा त्याच्या कुटुंब वर संकटाने घाला घातला तर त्याच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत प्रशासन कडून दिली जात नाही. मग हे काम शिक्षक कसे करतील? असा प्रश्न काही सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply