आमरण उपोषणाचा इशारा; बीडीओंना निवेदन
पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील दहिगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले आहे. काही दिवसांत येथील पाणी प्रश्न सुटला नाही, तर 7 एप्रिलला ग्रामस्थांसह रिकामे हंडे घेऊन पंचायत समिती दालनासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, दहिगाव बौद्धवाडी येथील ग्रामस्थ मागील दोन वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करीत आहेत, मात्र ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नावर गांभीर्याने विचार न करता केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांवर विकत पाणी आणायची वेळ आली आहे. शासनाने 15 वित्त आयोगातून पाणीपुरवठाकरीता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला असतांना केवळ हा समाज बौद्ध व मागास असल्याने त्यांची पाणीपुरवठा योजना लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केला. गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड महासचिव आनंद जाधव, युवा अध्यक्ष राहुल गायकवाड, युवा महासचिव प्रशांत गायकवाड, मयूर गायकवाड, अनिकेत लोखंडे यांसह नेते मंगेश वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
येथील पाणीप्रश्न लवकरच सोडवला जाईल. येथील पाणीपुरवठा योजनेसाठी अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करू.
-विजय यादव, गटविकास अधिकारी, पाली-सुधागड