अपुरा पाऊस; 25 टक्के भातलावणी शिल्लक
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात कशेळेपासून पुढे असलेल्या आदिवासी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. शेतात पाणी नसल्याने भाताची लावणी पूर्ण झाली नसून प्रामुख्याने आदिवासी भागातील जमीन ही माळवरकस असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकर्यांना पीक विमा काढण्याची संधी असताना कर्जत तालुक्यात जेमतेम 15 टक्के म्हणजे 1400 शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे. त्यात गतवर्षीच्या तुलनेत केवळ 30 टक्के पाऊस झाला असून पावसाचा मुख्य महिना कोरडाच गेला आहे.
कर्जत तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जात असून 9500 शेतकरी रब्बी हंगामात भाताची तसेच नागली व वरीची शेती करतात. दरवर्षी जून महिना सुरू झाला की शेतीची कामे सुरू केली जातात, मात्र यावर्षी जूनच्या दुसर्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस पुन्हा गायब झाल्याने भाताची रोपे वेळेवर तयार झाली नव्हती. त्यानंतर जूनच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या 15 दिवसांत चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी भातलावणी करण्याचा प्रयत्न केला. सखल भागातील शेतकर्यांना भातशेती वेळेवर करता आली, परंतु माळरानावर असलेल्या शेतात पुरेसे पाणी नसल्याने शेतकर्यांना वेळेवर भातलावणी करता आली नाही.
लवकरच पाऊस पडेल आणि भाताची लागवड करू, अशा भ्रमात राहिलेला शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या 15 दिवसांत पावसाचा टिपूसदेखील कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात झाला नाही. परिणामी शेतातील जमीन दगडासारखी कडक बनली आहे. त्यामुळे भाताचे रोपही काही ठिकाणी सुकून गेले. तालुक्यातील सरासरी भातशेती क्षेत्राचा विचार करता किमान 25 टक्के भाताचे लागवड क्षेत्र या वर्षी आतापर्यंत ओसाड गेले आहे. हे क्षेत्र प्रामुख्याने आदिवासी भागातील असल्याने आधीच सुरू असलेला लॉकडाऊन व त्यानंतर आलेली आर्थिक स्थिती पाहता आदिवासी शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची शक्यता आहे.
ही स्थिती लक्षात घेता कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी समाज संघटनेच्या वतीने शेतीची लागवड झाली नाही अशा शेतीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अध्यक्ष भरत शिद, माजी अध्यक्ष जैतू पारधी तसेच दत्तात्रय हिंदोळा, कांता पादिर, दादा पादिर, मोतीराम पादिर, विलास भला आदी कार्यकर्ते आदिवासी भागात जाऊन माहिती संकलित करीत आहेत. पाऊस न झाल्याने सुका दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली असून पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास आदिवासी भागातील आणि माळरानावर भाताची शेती असलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे.