महाराष्ट्रचे लाडके विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात,
नवरा आणि नारळ
कसे निघतील ते नशीबच जाणे
असं आजी म्हणायची.
बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही.
दोन्हीही कसेही निघाले तरी
’पदरी पडले, पवित्र झाले’.
दोघांनाही देवघरात स्थान,
दोघेही पुज्य.
तसेच आज राजकारण्यांचे झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण आपण निवडून दिलेला उमेदवार कसा निघेल सांगता येणार नाही. निवडून दिला की तो पवित्र होतो, त्याची पूजा केली जाते. पु. ल. पुढे म्हणतात,
पार्ल्यातल्या फिश मार्केटबाहेर
मद्रासी अण्णाच्या गादीवर
नारळ रचून ठेवलेले असायचे.
हल्ली ऑनलाइन साइटवर
सगळ्या किमतीचे नवरे
असेच रचून ठेवलेले असतात.
नारळ म्हटलं की मला धडधडतं.
चांगला ओळखायचा कसा?
मी उगाचच कानाजवळ नेऊन
हलवून वगैरे बघत असे.
अण्णाला कळायचं हे गिर्हाईक
नवीन आहे. तो आपली
जाड पितळी अंगठी दोन-तीन
नारळावर टांग टांग वाजवून
हातात एक नारळ द्यायचा.
ये, लो! म्हणायचा.
मी विचारायचो, ’खवट’ निकलेगा तो?
तो म्हणायचा ’तुम्हारा नसीब!!’
तसेच आता आपल्या राजकीय पक्षाकडे सगळ्या प्रकारचे इच्छुक उमेदवार असतात.
चांगला ओळखायचा कसा? असा प्रश्नच असतो. नारळासारखा टांग टांग वाजवूनही घेता येत नाही. ’खवट’ निकलेगा तो?
तो अपना नसीब म्हणायचं!!
नारळ गोड निघाला
तर दडपे पोहे, सोलकढी व
खोबर्याच्या वड्या आणि
काय काय!
खवट निघाला तर पाण्यात उकळून
वर तरंगणारं कच्चं तेल
बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं.
कापलं, भाजलं, ओठ फुटले,
टाचांना भेगा पडल्या, केसांना लावलं,
थंडीत चोळलं, दुखर्या कानात टाकलं,
उत्तम घरगुती औषध.
किती उपयोगी,
किती बहुगुणी!!
थोडक्यात काय,
नवरा काय? नारळ काय?
गोड निघाला तर नशीब,
खवट निघाला तर उपयोगी,
हे कोकणी तत्त्वज्ञान.
ह्याला जीवन ऐसे नाव!!
तसेच आहे आपण निवडून दिलेला उमेदवार चांगला निघाला, तर देशाची प्रगती, मतदारसंघाचा विकास आणि भ्रष्टाचारी निघाला तर मग सगळ्या योजना याच्या खिशात, रस्ते आणि धरणाचा निधी पाण्यात. त्यामुळे धरण भरण्याचे काम अखेर बारामतीकर दादांनाच.
चैत्र पौर्णिमेपासून कोकणात आणि प. महाराष्ट्रात जत्रा सुरू होतात. त्यामध्ये पूर्वी कठपुतळी बाहुल्यांचा खेळ असे. एक रंगीबेरंगी कपडे घातलेला माणूस हातात नळकांड घेऊन ओरडत असे. त्याच्याजवळ एक बॉक्स असायचा. त्याला समोर आतले दृश्य पाहण्यासाठी दोन नळकांडी असायची. त्यावर काळे कापड असे. त्याला डोळे लावून आतले दृश्य पाहायचे. तो माणूस तोंडाने बडबड करीत. हाताची बोटे हलवायचा तशी आतली चित्रे बदलायची. त्याकाळी टीव्ही किंवा मोबाइल नव्हते. त्यामुळे जत्रेत हा खेळ पाहायला मुलांची गर्दी असायची. आताही चैत्र महिना सुरू आहे. सगळीकडे जत्रा सुरू झाल्या आहेत. देशात लोकसभेची निवडणूक असल्याने यंदा जत्रेला जास्तच महत्त्व आले आहे.
या कठपुतळी बाहुल्यांच्या खेळापासून प्रेरणा घेऊन आपल्या मराठी रामदास पाध्येंनी बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू केला. त्यांचा ’ अर्धवटराव’ जगप्रसिध्द झाला. त्याचे दहा हजारच्या आसपास खेळ त्यांनी विविध चॅनेल आणि रंगमंचावर केले. त्याची प्रसिध्दी पाहून आपल्या बारामतीकर पवारकाकांनी तसाच खेळ या निवडणुकीत करण्याचे ठरवले. त्यासाठी बाहुला म्हणून प्रथम त्यांनी ठाण्याच्या जितेंद्रची निवड केली होती, पण राजकारणात मुरलेल्या काकांच्या लक्षात आले की तमाम मराठी माणूस या बाहुल्याकडे आकर्षित होणार नाही. मग बंद पडलेल्या इंजिनाची काकांना आठवण झाली. बारामतीच्या काकांचा निरोप शिवाजी पार्कवर जाताच सध्या काम नसल्याने इंजीन धक धक करीत आल्याचे अवघ्या महाराष्ट्राने याची देही, याची डोळा पाहिले. राजकीय जत्रेत बारामतीकर काका कठपुतळीवाले बनून आपल्या हाताने बाहुल्याचे दोरे हलवत आहेत. बाहुला इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, असे म्हणताच काका पुन्हा हात वर करतात. आवाज येतो, ’आता लाव रे जरा तो व्हिडीओ’ हा खेळ पाहण्यासाठी इंटरनेटच्या जमान्यातही गर्दी होत आहे.
आता बाहुल्याचा कार्यक्रम म्हटला तर आबालवृध्दांना करमणूक. त्यामुळे गर्दी होणारच. त्यात बारामतीकर काकाच खेळ करताहेत म्हटले की तमाम राष्ट्रवादीवाले मनसे खेळ पाहायला येणारच, पण त्या कमळवाल्या विनोदजींना गर्दी पाहून राहवले नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला विचारले की, या बोलक्या बाहुल्याच्या खेळाच्या तिकिटाचा खर्च कोण करतो? राज्याचे सांस्कृतिक खाते सांभाळणार्या विनोदजींनी विस्मरणात चाललेल्या कठपुतळीच्या खेळाला चालना द्यायचे सोडून असा
फालतू प्रश्न विचारणे योग्य आहे का? आता तुम्हीच ठरवा.
-नितीन देशमुख (7875035636)