मुरूड : प्रतिनिधी
पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा मुरूडजवळील जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यावर मंगळवारी (दि. 22) पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती वतीने शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘पदमदुर्ग जागर‘ करण्यात आला. छत्रपती शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रात पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला आहे. या किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या माध्यमातून दरवर्षी ‘पद्मदुर्ग जागर‘ कार्यक्रम साजरा करून शिवकालीन इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवप्रेमींच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली होती.
मुरुड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून मंगळवारी छत्रपती शिवरायांची पालखी बोटीमधून पद्मदुर्ग किल्ल्यावर नेण्यात आली. तेथील कोटेश्वरी मातेचे विधीवत पूजन करून महाराजांना अभिषेक घालण्यात आला. या वेळी मंदार पेंडसे यांनी पौराहित्य केले. त्यानंतर महाराजांची आरती घेऊन इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व पद्मदुर्ग किल्ला याबाबतची माहिती दिली. या वेळी खारआंबोली ग्रामस्थ मंडळा तर्फे तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षीके सादर करण्यात आली. महाराजांची पालखी गडावर फिरविण्यात आल्यानंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पद्मदुर्ग जागर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष अशीलकुमार ठाकूर, उपाध्यक्ष संकेत आरकशी, सहसचीव राहुल कासार, खजिनदार योगेश सुर्वे, महेंद्र मोहिते, महेश साळुंखे, अच्युत चव्हाण, रुपेश जामकर, सुनील शेळके, संतोष जंजीरकर यांच्यासह महिला मंडळ आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतली.