Breaking News

दीर्घकालीन की ट्रेडिंग; कोणता मार्ग योग्य ?

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करून नफा कमवावा? किती परतावा मिळण्याची आशा ठेवावी? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरे वेगळी काआहेतआणिती शोधण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे?

मागील लेखात आपण शेअरबाजारात एंट्री करण्याचे विविध पर्याय पहिले होते, आज आपण थेट शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे कांही प्रकार पाहू.

शेअरबाजारातील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळची गुंतवणूक हे समीकरण अगदी पक्कं झालंय कारण प्रत्येक क्षेत्राचं एक चक्र असतं, उदा. सिमेंटची विक्री पावसाळ्यात मंदावते, मार्च ते जून हॉटेल्स, प्रवासी कंपन्यांच्या फायद्याचे असतात. ऑगस्ट ते डिसेंबर हे दिवस कर्जवाटप कंपन्या किंवा बँकांसाठी सुगीचे असतात, इ. परंतु थोडं मागं पुढं झाल्यास सगळं गणित बिघडू शकतं आणि ते पूर्वपदावर यायला कांही वेळ जातो आणि हे ओळखून या कालावधीमध्ये ट्रेडर्स लोक अशा शेअर्सची विक्री करतात आणि भाव खाली येतात. नंतर हळूहळू या मूळ धरलेल्या कंपन्या पुन्हा बाजारात आपली हुकूमत सिद्ध करतात. हळूहळू त्यांच्या शेअर्सच्या किंमती पुन्हा वाढू लागतात. मात्र, या सर्व गोष्टींचा कालावधी कांही वर्षांचा असू शकतो आणि म्हणूनच यामधील गुंतवणूक ही दीर्घकालावधीसाठी गृहीत धरली जाते. जे झाड मागील काही वर्ष उन्हाळे पावसाळे झेलत उभं आहे ते कापायचा विचार करणं चुकीचं ठरू शकतं आणि हेच आज आपल्याला इन्फोसिस, एशियन पेंट्स, रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती, टायटन, हिंदुस्थान युनीलिव्हर, टीसीएस, विप्रो, यासारख्या कंपन्यांच्या मागील वीस वर्षांतील वाटचालीवरून अनुभवता येऊ शकतं.        

परंतु अनेक लोक दीर्घकाळासाठी म्हणून अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि थोडं कुठं इकडचं तिकडं झालं की त्यांच्या मनात येतं की आत्ता बाजार पडायला लागला तर विकून टाकू आणि पुन्हा खालच्या भावात खरेदी करू. अशानं कधीच गुंतवणुकीचा उद्देश पूर्ण होत नाही. कारण बाजार खाली आला तर आपले विचार बदलू लागतात. आपण अजून बाजार खाली पडायची वाट पाहत राहतो आणि ती सुवर्णवेळ कधीच गाठता येत नाही. त्यामुळं दीर्घकालीन गुंतवणूक अशाच कंपन्यांमध्ये करावी की ज्यांची बाजारातील पत उत्तम आहे व त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनांची पुढील 20 वर्षं शाश्वती आहे. मग अशा कंपन्या वर्षोनुवर्ष सांभाळत बसायला हरकत नसावी. आपण कंपनीबद्दल 100 टक्के विश्वासू नसतो आणि म्हणूनच बाजार पडताना आपल्याला भिती वाटते. आपण अशी चांगलीगुंतवणूक विकून टाकतो. खरं म्हणजेअशी दीर्घकालीन गुंतवणूक काहीही झालं तरी कमीतकमी दहा वर्षं विकू नये. हा झाला गुंतवणुकीचा उत्तम मार्ग. हा सोपा मार्ग मात्र प्रत्यक्षात कठीण असतो तरीही हा मार्ग न जोपासल्यास देखील वर्षाकाठी आपल्या गुंतवणुकीवर 20 टक्के नफा गृहीत धरल्यास आणि ही गोष्ट काटेकोरपणे पाळल्यास 1 लक्ष रुपयांच्या गुंतवणुकीतून पुढील वीस वर्षांत सुमारे 38 लाखांवर संपत्ती निर्माण करता येऊ शकते.

या खेरीज शेअर बाजारात गुंतवणूक, खरं तरट्रेडिंगकरण्याच्या विविध पद्धती आहेत, स्कालपिंग (मोठी पोझिशन घेऊन अगदी छोटे छोटे व्यवहार करून नफा कमावणं), डे-ट्रेडिंग ज्यामध्ये 6 तासांत आपले खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करणं, स्विंग ट्रेडिंग म्हणजे दोन दिवस ते तीन आठवड्यांसाठी शेअर्स खरेदी करून नफा कमावणं (शक्यतो हे लोक वायदे बाजारात म्हणजेच फ्युचर्स मध्ये व्यवहार करतात), शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स म्हणजे कांही महिन्यांसाठी गुंतवणूक आणि लाँग टर्म म्हणजे दीर्घावधीसाठी म्हणजे कांही वर्षांसाठी गुंतवणूक करणं. आता या प्रत्येक व्यवहारात गुंतवणूकदार काही भांडवल लावत असतो व त्यावर जोखीम घेत असतो. म्हणूनच घेणार्‍या जोखमीवर ठरावीक टक्केवारीत नफा कमावणं व त्यात समाधान बाळगणं हेच खरं यश आहे. शेअरबाजारामार्फत साधारणपणे वर्षाकाठी 15-20% नफा गृहीत धरल्यास प्रत्येक गुंतवणुकीतून इतका नफा मिळाला की त्यात समाधान मानणं गरजेचं आहे. डे-ट्रेडर्स आहेत त्यांनी ही बाब विशेष लक्षात घ्यावी. समजा तुम्ही 1 लक्ष रुपयेभांडवलाची जोखीम घेत असाल तर वर्षाकाठी 20%  म्हणजे 20हजार म्हणजेच दिवसाला साधारणपणे 100 रु. कामवायचीच अपेक्षा ठेवा. जरी एका वर्षात 250 व्यवहाराचे दिवस गृहीत धरले तरी वर्षाकाठी 25 हजार रुपये नफा पदरात पाडता येऊ शकतो आणि हीच वस्तुस्थिती आहे. कोणाच्या भूल-थापांना बळी पडून लाखो रुपये फी भरून अमूक एक कोर्स केल्यास किंवा कोणतेतरी सॉफ्टवेअर घेऊन रोजचा 10 टक्के फायदा कमावता आला असता तर बाकीच्या मोठ्या लोकांनी इतर व्यवसाय बंद करून हेच केलं असतं, हे लक्षात घ्यायला हवं. ट्रेडिंग शिकवण्यासाठी अनेक शिक्षक सध्या या लॉकडाऊनमध्ये सरसावलेले दिसतात. यात गैर काही नाहीये परंतु शिक्षणाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा शुल्क घेणं हे थोडंसं न पटण्यासारखं आहे. कारण कितीही शिक्षण घेतलं तरी शेअरबाजारातून नफा कमावणं हे शास्त्र नसून ती एक कला आहे आणि त्यामुळं ठोस असं बाजारात कांही नाही. सर्वकाही तुमच्या शिस्त व काटेकोरपणावर अवलंबून आहे आणि यासाठी लाखो रुपये शुल्क मोजण्यासारखं खरंच काही नाहीये. कारण स्वत:चा अभ्यास हा लागतोच.

त्यामुळं बाजारातील अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवर झुलून ट्रेडिंग करून भांडवल खेळतं ठेवणं, आपला वीस टक्के नफा पदरात पाडून घेणं अथवा एखाद्या उत्तम कंपनीमध्ये प्रदीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून संपत्ती निर्मितीची कास धरणं असे अनेकविध पर्याय आपणांसमोर असतात.  सध्या तरी त्यामुळं आपण केलेल्या गुंतवणुकीवर ठीकठाक परतावा मिळाल्यास त्यातून नफा कमावून बाहेर पडणं, हाच महत्वाचा मूलमंत्र आहे, नाहीतर लाभातून लोभात गेल्यास सगळंच मुसळ केरात..

सुपरशेअर्स – फार्मास्युटिकल्स

र्एींशीू वरीज्ञ लर्श्रेीव हरी ीळर्श्रींशी श्रळपळपस. अशी एक म्हण आहे म्हणजेच वाईटात चांगलं शोधणं. जेंव्हा जगभरात अजूनही कोरोनामुळं अनिश्चिततेचं वातावरण पूर्णपणे निवळलेलं नाहीय परंतु एक क्षेत्र मात्र जोर धरून आहे, ते म्हणजे फार्मा म्हणजेच औषध कंपन्या. कारण कोरोनावरील लस ज्याला सापडेल त्याचं उखळ पांढरं होणार हे निश्चित. भारत जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. भारतीय औषध क्षेत्र विविध लशींच्या जागतिक मागणीपैकी 50 टक्क्यांहून अधिक, तर अमेरिकेतील सर्वसाधारण मागणीपैकी 40 टक्के आणि यूकेमधील सर्व औषधांपैकी 20 टक्के पुरवठा करतं. गेल्या आठवड्यात सर्वच औषधी कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले. सन फार्मा, सिप्ला, डिविज लॅब, ऑरो फार्मा, कॅडिला, इ. कंपन्यांच्या शेअर्सनी तर आपले वर्षभरातील उच्चांक ओलांडले. यापैकी डिविज लॅबच्या शेअर्सनी मागील आठवड्यात 11.39 टक्क्यांची सर्वात मोठी झेप घेतली. अजूनही त्यामध्ये धुगधुगी शिल्लक आहे.

सोने, बाजार आणि कोडॅक मूव्हमेंट

गेल्या आठवड्यात बाजारात नफेखोरी दिसून आली, निफ्टीनं 11341.4 ही उच्चांक पातळी गाठली असली तरी त्या स्तरावर बाजार टिकू शकला नाही आणि मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या आठवड्यात निफ्टी सुमारे 1 टक्का तर सेन्सेक्स 1.37 टक्के खाली बंद झाले. अनलॉक 3 मध्ये मल्टिप्लेक्स व चित्रपटगृहं सुरु होतील या आशेवर स्वार झालेले पीव्हीआर, आयनॉक्स या कंपन्यांचे शेअर्स खाली आले तर फिनिक्स सारख्या मॉलचे शेअर्स वधारले. दुसरीकडं, रशियानं केलेल्या घोषणेमुळं आपल्याकडील फार्मा कंपन्या तेजीत राहिल्या तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदर जैसे थे ठेऊन बाँड खरेदीस पाठिंबा दिल्यानं अमेरिकन डॉलर घसरला व सोन्यानं पुन्हा नवीन उच्चांक गाठला. अमेरिकी बाजारात 1984 डॉलर्स प्रति औंस तर मुंबई सराफी बाजारात 55750 रुपयांचा भाव गाठला गेला. गेल्या आठवड्यात अमेरिकन शेअरबाजारात एक कोडॅक मूव्हमेंट झाली, म्हणजे इस्टर्न कोडॅक कंपनी आपला मूळ फोटोग्राफी संबंधित व्यवसाय बंद करून जेनरिक ड्रगला लागणार्‍या गोष्टी तयार करणार असल्यानं अमेरिकी सरकार त्यांना 765 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज बहाल करणार, या बातमीनं या कंपनीच्या शेअर्समध्ये न भूतो, न भविष्यती तेजी पाहायला मिळाली. हा शेअर एका आठवड्यात 2757 टक्के उसळला. यालाच कोडॅक मूव्हमेंट म्हटलं जातंय आणि आता हा एक वाक्प्रचार प्रचलित होताना दिसतोय. मागील लेखात म्हटल्याप्रमाणं निफ्टीनं 11341 हा उच्चांक नोंदवला आणि 11350 ही प्रतिकार पातळी तोडण्यात अपयशी ठरली. त्याजबरोबर गुरुवारी व शुक्रवारी नरम बाजारातसुद्धा 11000 ही आधारपातळी तोडली नाही. या आठवड्यासाठी 11350 ही पुन्हा प्रतिकार पातळी असू शकेल तर 11000 व 10550 ह्या आधारपातळ्या संभवतात. मान्सूनची योग्य वाटचाल, शहरातून गावाकडं परतलेला मजूर वर्ग आणि त्यामुळं सहज उपलब्ध होणारा कामगार इ. बाबी कृषी व ग्रामीण संबंधित कंपन्यांचा बोलबाला अधोरेखित करत आहेत, यात नवल नाही.   

-प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpadvisers@gmail.com

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply