आरोग्य प्रहर
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणासारखे आजार टाळण्यास मदत करतात. हे सर्व घटक हृदयरोगास कारणीभूत ठरतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, काम व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे वाढत्या आजारांची कारणे आहेत.
जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे नसलेले साखर व मीठ जास्त असलेले पदार्थ नेहमी खाणे, मैदा व मैद्याच्या पदार्थांचा आहारात समावेश, बाजारातील पॅकेटबंद खाण्याच्या पदार्थांचा रोज वापर सगळ्यांच्या जीवनशैलीचा भाग बनले आहे. याचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे सर्व आजारांना निमंत्रण मिळते व त्यात हृदयरोग, लठ्ठपणा व मधुमेह हे प्रामुख्याने लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत.
फळे व भाज्यांतून आपल्याला भरपूर व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतात. यातून भरपूर तंतुमय पदार्थ शरीराला मिळतात. ही पोषकतत्त्वे हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाची आहेत. रोज फळे व कच्च्या भाज्यांचे एक वाटी सलाड शिजवलेल्या व्यतिरिक्त खाल्ले तर खूप फायदा होईल.
धान्यांचा आहारात समावेश असावा. धान्यांचे पीठ बनवताना जाडसर दळावे. मैद्यासारखे बारीक पीठ वापरू नये. जेवढा पिठात कोंडा असेल तेवढे चांगले. पास्ता खाणार्यांनी मैद्याचा पास्ता न खाता गव्हाचा पास्ता खावा. आहारात प्रोटिनचा योग्य प्रमाणात समावेश करणेही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. डाळी, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मासे योग्य प्रमाणात घ्यावे. मटन किंवा मांसाहारी पदार्थातील लिवर, किडनी असे भाग टाळावेत. आहारात सोयाबीनचाही उपयोग करता येईल, दूध व दुधाचे पदार्थ जसे दही किंवा पनीर तयार करताना साय काढून केल्यास उत्तम. हृदयरोगात रक्तवाहिनीत चरबी साठून रक्त प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास हार्ट अॅटॅक येतो. हे टाळण्यासाठी योग्य प्रमाणातच आहारात तेल-तुपाचा समावेश करावा. एकूण कॅलरीजच्या गरजेपैकी साधारणत: 20 टक्के स्निग्ध पदार्थांतून म्हणजे तेल-तुपातून आल्या पाहिजेत. फ्रीजमध्ये न ठेवता जे तेल गोठते ते हृदयासाठी चांगले नाही, जसे वनस्पती तूप किंवा बटर. तेलबियांतील चांगले गुण मिळण्यासाठी वेगवेगळ्या तेलबियांचे तेल बदलून वापरले पाहिजे.