माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून मागील सात दिवसांत 164 नवे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी तालुक्यातील तमाम नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
माणगाव तालुक्यात अनलॉक प्रक्रियेत कोरोनाचे रुग्ण दरदिवशी आढळत असल्याने ही प्रशासनाबरोबरच नागरिकांसाठीही धोक्याची घंटा आहे. तालुक्यात 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत 164 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याबाबतची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सरकारच्या सूचनांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. गर्दीपासून दूर राहावे. स्वच्छतेच्या बाबतीत अधिकत सतर्क राहावे. तसेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये आणि मीच माझा रक्षक समजून वागावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर यांनी केले आहे.