मोठ्या दुर्घटनेची शक्यता; ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील उसरोली वालवटी पूल धोकादायक झाला असून सदरचा पूल कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलावरून पास झाल्यावर बाजूच्या चार गावांशी संपर्क होऊ शकतो, परंतु हा पूल कोसळल्यास ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटून मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
सदर पूल जिल्हा परिषद अंतर्गत बांधला गेला आहे. पूल बांधून आज 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून पुलाच्या खालील सळया बाहेर आल्या आहेत. त्याचप्रमाणे पुलास खड्डे पडले आहेत. काही भाग दबलेलाही दिसून येत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी सदरचा पूल खूप जुना असून या पुलाची जिल्हा परिषद अधिकारीवर्गाने पाहणी करून सदर पूल वाहतुकीस योग्य आहे किंवा नाही, त्याचप्रमाणे गरज असेल तर दुरुस्ती अन्यथा नवीन पूल बांधून मिळण्याची मागणी केली आहे.
उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी सांगितले की, हा पूल खूप जीर्ण झाला असून लोखंडी कठडे त्याचप्रमाणे जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलाच्या खालील भागाच्या लोखंडी सळया निघाल्या आहेत. याबाबत उसरोली ग्रामपंचायतीच्या वतीने 2019मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून सदर पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती अथवा नवा पूल बांधून मिळण्याची मागणी केली. या पुलाकडे दुर्लक्ष्य झाल्यास महाड येथील सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे दुर्घटना घडू शकते. तरी जिल्हा परिषदेने त्वरित लक्ष देण्याची मागणी नांदगावकर यांनी केली आहे. पंचक्रोशी अध्यक्ष फैरोज घलटे यांनी सांगितले की, या पुलास धोका पोहचल्यास जाण्या-येण्याचा प्रमुख मार्ग बंद होऊन या भागातील लोकांचे मोठे हाल होणार आहेत. जिल्हा परिषदेने या पुलाकडे लक्ष देऊन या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही घलटे यांनी केली आहे.