कोणतेही असाधारण कार्य करणार्या व्यक्तिमत्वाला असाधारण विचारांचा वारसा असतो. कर्मवीरांच्या बाबतीतही हेच घडले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला महात्मा फुले, शाहू महाराजांचा वैचारिक वारसा लाभला होता. छत्रपती शिवरायांना लोक रयतेचा राजा म्हणत महात्मा फुले यांनीही रयतेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य केले. कर्मवीरांचे समकालीन फुले, शाहूंचे वारसदार डॉ. बाबासाहेबांनीही रयतेसाठीच कार्य केले. रयत म्हणजे सामान्य जन सामान्य जनांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करण्यासाठी या महापुरुषांनी आपले जीवन झिजविले त्याचाच शैक्षणिक वारसा कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढे चालविला. आज 22 सप्टेंबर थोर शिक्षणतज्ञ समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती.
या युगपुरुषाचा जन्म पायगोंडा पाटील आणि गंगाबाई पाटील या दांपत्याच्या पोटीकुंभोज गावी अश्विन शुद्ध 5 ललित पंचमी या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर 1887 या शुभदिनी झाला. भाऊराव पायगोंडा पाटील यांच्या रूपाने एक देवदूत जन्माला आला. बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली केली. वसतिगृहयुक्त शिक्षणाची व्यवस्था करून अठरापगड जातीच्या मुलांना सहजीवनाचा मंत्र दिला. देशाभिमान, देश कल्याण, देशभक्ती यासाठी एका समर्पित साधुत्वाचा जन्म होता तो.
कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था ही निव्वळ शिक्षण देणारी संस्था उभी केली असे नव्हे तर त्यांनी सामाजिक परिवर्तनाची एक प्रयोगशाळाच उभी केली. कराड जवळील काले याठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. महाराष्ट्राच्या सर्व भागातील प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते. ही परिषद 4 ऑक्टोबर 1919रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर घेतली गेली. पुण्याचे वकील केशवराव बागडे अध्यक्षस्थानी होते. भाऊराव पाटील बोलण्यास उठले नुसत्या भाषणाने आणि परिषदांनी आपला बहुजन समाज सुधारेल असे मला वाटत नाही. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी एक शिक्षण संस्था स्थापन करणे गरजेचे आहे. सूचना सर्व परिषदेत पसंत पडली भाऊरावांनी त्या शिक्षण संस्थेत रयत शिक्षण संस्था नाव दिले. स्वतः कष्ट करून शेती पिकवणार्या कष्टकर्यालिा रयत म्हणत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रिय प्रजेला रयत म्हणत त्या दिवसापासून काले याठिकाणी वसतिगृह सुरू करून शिक्षण संस्थेच्या कार्यालाप्रत्यक्षात सुरुवात झाली.
कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये राबवलेली ‘कमवा आणि शिका’ ही योजना असाधारण होती या योजनेमार्फत सामान्यांच्या उद्धारासाठी कार्य केले आजही विद्यापीठातून मोठ्या पदव्या संपादन करून मोठ्या हुद्यावर गेलेले अधिकारी अभिमानाने सांगतात की कर्मवीरांनी अमलात आणलेली ही युक्ती म्हणजे सामान्य विध्यार्थासाठी उच्चंशिक्षणाचे दार उघडून देणारी मास्टर की आहे. रयत शिक्षण संस्थेने जे यश संपादित केले त्याचे प्रमुख कारण म्हणजे कर्मवीरांची कर्तव्यनिष्ठा विद्यार्थ्यांप्रती आपलेपणाची भावना, संघटन कौशल्य आणि जीवनात परिवर्तन घडवूनआणण्याची क्षमता.
कर्मवीरांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा विचार पोहोचविला महाराष्ट्रातील 14 व कर्नाटक राज्यातील 1अशा 15 जिल्ह्यात 438 विद्यालय, 42 महाविद्यालय, 33 पूर्व प्राथमिक शाळा, 51 प्राथमिक शाळा, 8 आश्रमशाळा, 7 अध्यापक विद्यालय, 91 वस्तीगृहे, 7 प्रशासकीय कार्यालय, 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 1 रयत इन्स्टी ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट सातारा, 57 इतर अशा 737 शाखा कार्यरत आहेत.
डॉ. कर्मवीरांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे रुपांतर आज वटवृक्षात झाले आहे. शैक्षणिक प्रसाराबरोबरच आधुनिक काळाला उपयुक्त असणारे शिक्षण संस्थेमार्फत दिले जात आहे. कर्मवीरांचे महानिर्वाण 9 मे, 1959 रोजी झाले. सातार्याचा वटवृक्ष उन्मळून पडला. भाऊरावांनी इहलोकची यात्रा संपवली होती.
प्राची पर सुरज कल भी प्रभात ले आयेगा,
ऐसा सुरमा कर्मवीर अभी न हो पायेगा
॥ जय कर्मवीर ॥
-एच. एन. पाटील (उपशिक्षक), तु. ह. वाजेकर विद्यालय, फुंडे