पेण ः प्रतिनिधी
स्वच्छता अभियानाच्या दिशेने पेण नगर परिषदेचे पाऊल पुढे पडत असून, याअगोदर विश्वेश्वर स्मशानभूमीजवळचे डम्पिंग ग्राऊंड हटवून ते आंबेघर येथे शिफ्ट केले. घनकचरा प्रकल्प कार्यान्वित केले, तसेच आज तिसरे पाऊल उचलत हायवा कंपनी व एस. जी. एस. कंपनीच्या सहकार्यातून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम पेण नगर परिषदेने केले. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानात प्रगतीचा निर्देशांक वाढत असल्याचे मत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रकल्प लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. या प्रकल्प लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, प्रांताधिकारी विठ्ठलराव इनामदार, मुख्याधिकारी अर्चना दिवे, नगरसेवक, नगरसेविका, कंपनीचे व्यवस्थापक सुधीर दाबेकर, मोहन घाडगे, मिलिंद म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की, पेण शहरावर माझे विशेष प्रेम असून, मागील काळात दीड वर्ष प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. नगराध्यक्ष प्रीतम पाटील व त्यांचे सहकारी नेहमी विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे मी जवळून पाहिले आहे. स्वच्छ भारत अभियानातील पेण नगर परिषदेची ही उल्लेखनीय कामगिरी इतर नगरपालिकांसाठी आदर्शवत ठरणारी आहे. भविष्यात पेण नगरपालिकेची वाटचाल ‘अ’ वर्ग अथवा महानगरपालिकेच्या दिशेने होणार असून आताचे प्रकल्प पुढील काळात लाभदायक ठरणार आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा, असेही त्यांनी सांगितले या वेळी प्रमुख पाहुणे आमदार रविशेठ पाटील यांनी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून पेणमध्ये अनेक विकासकामे झाली असून, यात रिंगरोडसारखा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्यामुळे पेणमधील वाहतूक व्यवस्था व शहराचा विकास होणार असून अशा लोकोपयोगी प्रकल्पात सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी विकासकामांबाबत माहिती देऊन नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शासनाकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी या प्रकल्पामुळे गाड्यांच्या फेर्या कमी होऊन कचरा वाहतुकीचे अंतरदेखील कमी होणार असल्यामुळे पेण नगर परिषदेचा आर्थिक फायदा होणार आहे. हायवा व एस. जी. एस. कंपनीच्या वतीने सी. एस. आर. फंडातून पेण न. प.साठी एक कोटी 15 लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प येथे कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी कंपनीचे विशेष आभार मानले. प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ लवकरच कार्यान्वित केले जाईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ व आभार प्रदर्शन मिलिंद म्हात्रे तसेच कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी केले होते.