Breaking News

उरण तालुक्यातील ऐतिहासिक शिलालेखांच्या संवर्धनाची गरज

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरातील काही ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अतिपुरातनकालीन पाषाणातील दुर्मिळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदित गधेगळ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेखांच्य संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. कारण येथील शिलालेख अडगळीत पडलेेेले आहेत, तसेच काही जणांनी देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चिरनेर येथील शिवमंदिराच्या उभारणीच्या कामासाठी उत्खनन सुरू होते. या उत्खननात शिलालेख आढळले होते. चिरनेर येथे काही वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन शिलालेखांपैकी एक शिलालेख शंकर मंदिराच्या तळ्याकाठी धुळखात अस्तित्वहिन अवस्थेत पडून आहे. तर दुुसरा शिलालेख चिरनेर येथीलच भैरवनाथ मंदिराच्या परिसरात शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे. त्याचप्रमाणे असेच ऐतिहासिक शिलालेख कळंबुसरे येथील गावात तीन तर आवरे गावात दोन ठिकाणी आढळून आले आहेत. यापैकी काही शिलालेख शेतीच्या बांधावर, घर, मंदिर  तर काही शिलालेख मंदिर परिसरात सापडली आहेत. अंधश्रध्देतून बहुतांश शिलालेख शेंदूर फासलेल्या अवस्थेत अनेक वर्षांपासून अडगळीत पडून असल्याची माहिती ग्रामस्थ आणि पत्रकार महेश भोईर यांनी दिली आहे. शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात. मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. त्यांची पूजा करणे अशा अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणे अपेक्षित असताना मात्र ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे. यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गधेगळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रत्येक शिलालेख आणि शिल्प तीन टप्प्यांत विभागली गेली आहेत. वरच्या टप्प्यात चंद्र, सुर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या टप्प्यात काही मजकूर कोरलेले दिसते. तर खालच्या टप्प्यात एक गाढव महिलेवर आरुढ होऊन जबरदस्तीने समागम करीत असल्याची कोरीव प्रतिमा दिसत आहे, अशी प्रतिमा आणि लेख असल्यानेच या शिलालेखाला गधेगळ नाव पडले असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. शिलालेखामधील असलेला मजकूर म्हणजे राजाकडून देण्यात आलेली एक प्रकारची लेखी धमकीच दिलेली असते. शिलालेखा प्रमाणे दिलेली आज्ञा जे कोणी पाळणार नाहीत त्यांच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार केला जाईल असा अर्थही इतिहास संशोधकांनी काढला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी हे गधेगळ शिलालेख आढळून आले असून ते 10 ते 16 व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याचा निष्कर्षही इतिहास संशोधकांनी काढला आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply