Breaking News

सोनगिरी किल्ल्यावर फडकला भव्य ध्वज

वेध सह्याद्री संस्थेच्या प्रयत्नांनी मोहीम यशस्वी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
कर्जत-खालापूर तालुक्यांच्या मध्यभागी संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनगिरी किल्ल्यावर वेध सह्याद्री संस्थेच्या बीड खुर्द जांबरूंग पंचक्रोशी विभागामार्फत स्थानिक रहिवासी व सहकारी संस्थेच्या सहकार्याने भव्य भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. सोनगिरी किल्ल्यावर पूर्वी असलेला ध्वज कमकुवत झाला होता. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करीत 33 फुटी भक्कम ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
सोनगिरी किल्ला खोपोलीहून पळसदरी-कर्जतकडे जाताना अगदी सहज नजरेस पडतो. किल्ला कायमच दुर्लक्षित राहिला आहे. चढण्यास अतिशय अवघड असलेल्या किल्ल्यावर संस्थेच्या सदस्यांनी पोल चढवत उभारलेला ध्वज आता पळसदरी, केळवलीसह आजूबाजूंच्या गावातून अगदी सहज नजरेस पडत असल्याने या कार्याबद्धल स्थानिकांकडून वेध सह्याद्रीच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
ध्वजस्तंभ उभारल्यानंतर पूजनाचा व ध्वजारोहणाचा मान वेध सह्याद्रीतर्फे गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात कार्यरत असल्या हिंदुस्थान दुर्गभ्रमण, बा रायगड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थांचे सदस्य तसेच नावंढे, पळसदरी व केळवली येथील ग्रामस्थांना देण्यात आला. त्याचबरोबर बालशाहीर शौर्य निंबाळकर यांचे पोवाडे आणि श्लोक मते यांनी शिवकाव्य सादर केले. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम झाला.
केवळ ध्वज बसवून शांत न राहता येणार्‍या काळात सोनगिरी किल्ल्यावर संवर्धन मोहिमांचे आयोजन करून किल्ल्याला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या वेळी वेध सह्याद्रीमार्फत सांगण्यात आले.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply