Breaking News

टपरीधारकांकडून करवसुली करणार; नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय

कर्जत : बातमीदार

नेरळमधील बहुतेक रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय केले जात आहेत. त्या टपरीधारकांकडून आता नेरळ ग्रामपंचायत कर वसूल करणार आहे. ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फुटपाथवर व्यवसाय करणार्‍या दुकानदारांकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड रस्त्याचा एक भाग फेरीवाल्यांनी व्यापला आहे. गणेश घाट परिसरातील रस्तेदेखील फेरीवाल्यांनी अडविले आहेत. रल्वे स्टेशन भागातील रस्त्यावर किमान 100 फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्या व्यावसायिकांकडून ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचे कर आकारत नाही. त्यामुळे ते सर्व फेरीवाले बिनदिक्तपणे व्यवसाय करीत असून त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. नेरळचे तत्कालीन सरपंच रावजी शिंगवा यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गणेश घाट रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या दुकानदार यांच्याकडून दैनंदिन कर वसूल करण्याचा ठराव घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य मंडळाने आता त्या ठरावात बदल केला आहे. गणेश घाट परिसरासह  नेरळ बाजारपेठ भागातील रस्त्यावर आणि फुटपाथवर बसून व्यवसाय करणार्‍या सर्वांकडून कर वसूल करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पारीत केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी दिली. या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता गेली अनेक वर्षे कर न भरणार्‍या नेरळमधील फुटपाथवर व्यवसाय करणार्‍यांकडून दैनंदिन कर वसूल करण्यात येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply