सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्याच केली, असा निर्वाळा दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इस्पितळातील गुन्हेवैद्यक मंडळाने नुकताच दिला आहे. गुन्हेवैद्यक मंडळाचा हा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्र सरकारला मिळालेली क्लीन चिट आहे असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. महत्त्वाचे म्हणजे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने अजून आपला तपास पूर्णदेखील केलेला नाही. तरीदेखील राज्य सरकार स्वत:ची पाठ का थोपटून घेत आहे हे कळत नाही.
बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूचे गूढ जेव्हा उकलेल तेव्हा उकलेल, परंतु ठाकरे सरकारला मात्र या प्रकरणातून निष्कलंकपणे बाहेर पडण्याची घाई झालेली दिसते. एम्सच्या डॉक्टरांनी सुशांत सिंहचा पोस्टमॉर्टेम आणि व्हिसेराचा अहवाल व त्याबद्दलचे निष्कर्ष सीबीआयकडे सोपवले. सुशांतची हत्या झाली असावी असा आरोप सुरुवातीला केला गेला होता. त्यात तथ्य नाही हे आता गुन्हा वैद्यक शाखेने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांची आणि महाराष्ट्राची नाहक बदनामी केल्याची आरोपवजा चिखलफेक राज्य सरकारातील काही नेते करीत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर त्यांच्यावरदेखील कडी करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्कारण आगपाखड केली. मुंबई पोलिसांना दूषणे देणार्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार फडणवीस करणार का, असा सवाल गृहमंत्री देशमुख यांनी केला. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष खांद्याला खांदा भिडवून निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे. मुंबई पोलिसांवर टीका करणारे गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात सामील झाले आहेत, भाजपमध्ये नव्हे! बिहार निवडणुकीचे पक्ष प्रभारी म्हणून गेलेले देवेंद्रजी हे आता गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करतील असे म्हणणे हास्यास्पदच आहे. महत्त्वाचे म्हणजे गुन्हेवैद्यक मंडळाने काढलेला निष्कर्ष विचारात घेऊन सीबीआय आपल्या पुढील तपासाची दिशा निश्चित करेल. याचा अर्थ सुशांत सिंह प्रकरणात कोणालाही अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. तरीदेखील एवढ्याशा बाबीवरून राज्य सरकार स्वत:ची पाठ का थोपटून घेत आहे हे कळत नाही. सुशांत सिंहच्या मृत्यूला दोन महिने उलटूनदेखील मुंबई पोलिसांनी साधा एफआयआर दाखल केला नव्हता. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू होता असे समजायचे कशाच्या जोरावर? सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला आणखी एक काळी बाजू आहे. ती म्हणजे बॉलीवूडला पडलेल्या ड्रग्जच्या विळख्याची. त्या प्रकरणीदेखील सीबीआयने स्वतंत्र एफआयआर नोंदवला असून त्याचाही तपास सुरू आहे. त्या तपासातदेखील बॉलीवूडमधील अनेक तालेवार नावे पुढे येत आहेत. बॉलीवूडमधील पाटर्यांसाठी ड्रग्जचा पुरवठा करणार्या काही पेडलर्सना अटकदेखील झाली आहे. त्याबाबत मात्र राज्याचे गृहमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाहीत. हे सरकार कोणाला पाठीशी घालत आहे, असा प्रश्न त्यामुळेच मनात आल्याशिवाय राहत नाही. न झालेल्या परीक्षेत पास झाल्याचे पेढे वाटणार्या विद्यार्थ्यासारखी सरकारची अवस्था झालेली दिसते. विनाकारण भाजपवर तोंडसुख घेऊन राज्य सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही.