Breaking News

माथेरानमध्ये ई-रिक्षांना परवानगी द्या

भाजपचे राज्यपालांना साकडे

कर्जत ः बातमीदार
प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथे ब्रिटिशांनी घालून दिलेल्या नियमानुसार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर पर्यावरणस्नेही ई-रिक्षांना परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतील राजभवन येथे भेट घेऊन केली आहे.
या शिष्टमंडळात माथेरान येथील भाजप अध्यक्ष विलास पाटील, किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, व्यापारी सेल कर्जत तालुका अध्यक्ष सुनील सोनी, पनवेलचे नगरसेवक निलेश बाविस्कर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आदींचा समावेश होता. वाढीव गावठाण विस्तार योजना तत्काळ सुरू करा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
माथेरानमध्ये तेथील पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वाहनांना बंदी आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दस्तुरी नाका ते माथेरान हे अंतर सर्व पर्यटक आणि स्थानिकांना मिनीट्रेनचा अपवाद वगळता घोड्यावर बसून अथवा हातरिक्षा किंवा पायी चालत जावे लागते. हातरिक्षा चार माणसे ओढत असतात. ही अमानवी प्रथा बंद व्हावी आणि पर्यावरणस्नेही ई-रिक्षा सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षे स्थानिक लोक करीत आहेत. माथेरानमधील भौगोलिक स्थिती व विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता राज्यपालांनी राज्य सरकारला आदेश देऊन ई-रिक्षा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या वाढत असून, गावोगावी लोकसंख्यावाढीमुळे घरे बांधण्यास जागा नाही. त्यासाठी गावठाण क्षेत्र वाढविण्याची मागणी करणारे निवेदनही राज्यपालांना देण्यात आले. आपण मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply