Breaking News

वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे जखमी

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीसमोरून पायी जात असलेले निवृत्त तहसीलदार बाळकृष्ण खेडेकर (75) यांना पांढर्‍या रंगाच्या गाडीने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गाडीचालक गाडी घेऊन पसार झाला. दुसर्‍या घटनेत करंजाडे येथे कृष्णकुमार राय हे त्यांचा मित्र राजकुमार राय यांच्यासोबत मोटरसायकलवरून से.-आर 3 येथे जात होते. त्याच वेळी एका गाडीने त्यांच्या मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते दोघे जखमी झाले आहेत. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

घरफोडीतील सराईत गुन्हेगारांना अटक

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील शिरढोणपाडा गावातील भारती चौधरी यांच्या बंद घरात घरफोडी करून पाच लाख 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

पोलीस पथकाने गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त करून या भागात पाळत ठेवून एका आरोपीस पळस्पे फाटा, पनवेल येथून ताब्यात घेतले. त्याने आपले नाव अनिल लक्ष्मण नाईक असे सांगून हा गुन्हा त्याचा साथीदार राजेश नारायण वाजेकर याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी राजेश वाजेकरला शिरढोण पाडा येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून गुन्ह्यातील पाच लाख 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply