आरोग्य प्रहर
तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धूम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्याही सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवन पद्धती बदलण्याची गरज आहे.
* आपल्या क्षमतेनुसार काम करा. ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो.
* जास्त शत्रू निर्माण करू नका. जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत.
* सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.
* आपल्या गरजा कमी करा.
* आकस्मिक घडणार्या घटनांकडे शांत चित्ताने पाहा.
* नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.
* आपल्या मनाला सल्ला द्या. एखाद्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शांतपूर्वक विचार करा.
* पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या म्हणीतून शिका. मागचे अनुभव पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतात.
* तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो.
* रासायनिकदृष्ट्याही तणाव वाढतो. उदा. कॅफीन जास्त पोटात गेल्यास विशिष्ट हार्मोन्स वाढून तणावही वाढतो.
* नियमित व्यायाम, योग, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते. तणाव कमी होतो.
* नियमित ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो.
* दिवसभरात सतत काम न करतात थोडी विश्रांतीही घ्यावी. शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या व तो हळूहळू सोडा.
* आपली एक दिनचर्या बनवा. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ द्या.