पनवेल ः रामप्रहर वृत्त
मराठी रंगभूमी दिन आणि कोरोनाच्या संकटकाळानंतर नाट्यगृह अनलॉक होण्याच्या दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलतर्फे गुरुवारी (दि. 5) नाट्यगृह भाडे व इतर व्यवस्थापन तसेच कोविडनंतरच्या नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भातील काही मुद्दे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासमोर मांडण्यात आले. भाजप सांस्कृतिक सेल पनवेल मंडळ संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी याबाबतचे निवेदन सादर केले. नाट्यनिर्माते आणि इतर कलाक्षेत्रातील संस्थांना नाट्यगृह भाड्यामध्ये 50 टक्के सूट मिळणे व डिपॉझिट शुल्क माफ होणे अथवा सूट मिळणे, नाट्यगृहाचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे, नाट्यगृहामध्ये सॅनिटायझर हॅण्ड फ्री स्टॅण्ड उपलब्ध करणे, तसेच इतर टेक्निकल बाबींची तपासणी करून योग्य ती तरतूद करण्याविषयीच्या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. पनवेल शहरातील नागरिकांना पुन्हा नाट्यगृहाकडे वळविण्यासाठी इतर अनेक मुद्द्यांवरही या वेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी संबंधित अधिकारीवर्गाशी चर्चा करून येत्या काही दिवसांत याबाबत एक बैठक घेऊ. नाट्य आणि कला क्षेत्राला पुन्हा एकदा चालना मिळण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहू, असे आश्वासन उपस्थितांना दिले. या वेळी चिन्मय समेळ, गणेश जगताप, साई निकाळजे, प्रीतम म्हात्रे, आदित्य पुंडे आदी उपस्थित होते.