Breaking News

लपवाछपवीचे उत्तर महाराष्ट्राला हवेय!, देवेंद्र फडणवीस यांचा महाआघाडीला सवाल

मुंबई : प्रतिनिधी

अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत चर्चा करण्याऐवजी लपूनछपून बहुमत कसे सिद्ध करता येईल यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप व टीका केली आहे.

फडणवीस यांनी या संदर्भात ट्विट करीत महाविकास आघाडी सरकारला रोखठोक प्रश्न केले आहेत. भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवाछपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या सरकारकडे बहुमत असेल, तर लपूनछपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?, असेही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा आहेत. तरीही मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा उल्लेखही नाही हे दुर्दैवी आहे, अशी पहिली टीका केली होती. दरम्यान, मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामुळे भविष्यात अनर्थ ओढवेल, अशी भीती व्यक्त केली आहे. भाजप आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनीही या निर्णयावर टीका केली. धनुष्यबाणाच्या हातात घड्याळ बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे व चक्र उलटीच फिरणार! मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे नव्हे, असे ट्विट शेलारांनी केले आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply