केंद्रीय निवडणूक समितीत स्थान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी (दि. 17) घोषणा झाली. यात महाराष्ट्रातून फडणवीस यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. या समितीमध्ये देशभरातील भाजपच्या 15 बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी नड्डा आहेत. सचिवपदी बीएल संतोष, तर सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे.
दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीचीही बुधवारी घोषणा करण्यात आली. यात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा अध्यक्षपदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया सदस्यपदी, तर बीएल संतोष सचिवपदी असणार आहेत.