तसे पाहता कुठलेच वर्ष चांगले अथवा वाईट नसते. आपल्या सोयीसाठी मानवाने आखून घेतलेल्या कालगणनेचा तो एक प्रकार आहे. काळ हा काळ असतो व तो प्रवाही असतो. सहस्त्रक, शतक, दशक, वर्ष ही त्या काळाची आपल्या सोयीची रूपे. तथापि काळाचे 2020 सालातील हे बारा तुकडे संपूर्ण मानवी इतिहासात बदनाम ठरले. या वर्षातील बारा महिन्यांपैकी दहा महिने तर आपण सार्यांनी कोरोना विषाणूच्या दहशतीखाली काढले आहेत. आणखी 24 तासांनी भिंतीवरचे कॅलेंडर बदललेले असेल. त्याची जागा 2021 सालच्या दिनदर्शिकेने घेतलेली असेल. जुन्या दिनदर्शिकेचे भेंडोळे कचर्याच्या टोपलीत टाकण्यासाठी सारेच जग बहुदा उतावीळ झाले असेल. कारण.. सरत्या वर्षाने कॅलेंडर वापरणार्या एकमेव प्राणीमात्राला भरपूर छळले आहे. किंबहुना, गेले वर्ष आलेच नसते तर अधिक बरे झाले असते असे काही लोकांना निश्चितपणे वाटत असणार. अफाट वेगाने मानवी जीवितांचा घास घेत जगभर फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने गेल्या वर्षभरात अक्षरश: लाखो बळी घेतले. अब्जावधी रूपयांचा चुराडा झाला. अवकाशात झेप घेऊ पाहणार्या बुद्धिमान मानव जातीला या अदृश्य विषाणूने अक्षरश: हतबल करून सोडले. या वर्षाची ही सर्वात मोठी घटना ठरावी. घटना कसली, तिला दुर्घटनाच म्हणायला हवे. याशिवाय सरत्या वर्षाने आपल्या सार्यांनाच वेगवेगळे अनुभव दिले. वर्षाच्या सुरूवातीलाच नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन पेटले होते. मार्चमध्ये कोरोना विषाणूचा भारतात शिरकाव झाल्याचे ध्यानी आल्यानंतर आपल्या देशातील अस्तित्वात नसलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. देशातील आरोग्य व्यवस्थेचा गेल्या अनेक दशकांमध्ये उडालेला बोजवारा आणि सरकारी यंत्रणांची तयारी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यानंतर पाठोपाठ अवघा देश लॉकडाऊनच्या कालखंडात बंदीवान झाला. रस्ते सुनसान झाले. रेल्वे ठप्प झाली. जनजीवन बंद दाराआड अदृश्य झाले. ऐकू येत राहिले ते रुग्णवाहिकांचे भयचकित करणारे सायरन. अशा अनिश्चिततेच्या कालखंडात शहर-गावातील लोकांनी आपापले गाव गाठण्यासाठी धडपड सुरू केली. आणि जगातील सर्वात मोठे स्थलांतर आपल्या देशाला अनुभवावे लागले. एकीकडे कोरोनाचे थैमान ऐन भरात असताना लडाखच्या सीमेवर चीनने आगळीक केली आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण देशातील उद्योग-व्यवसाय बंद पडल्यामुळे अर्थव्यवस्थेचे चाक आणखीनच खोलात रुतले. कोसळत्या अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर लढण्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्नांची शर्थ करावी लागली. आता कुठे देशाचे अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागल्यासारखे वाटत आहे. एकीकडे कोरोना विषाणू, दुसरीकडे चीन आणि पाकिस्तान, तिसरीकडे उद्ध्वस्त अर्थव्यवस्था अशा चहुबाजूंनी, सर्व आघाड्यांवर आपण सारेच लढत होतो व आहोत. अजुनही संकटाचे ढग पुरते पांगलेले नाहीत. कोरोनाला रोखणार्या प्रभावी लसीचा शोध संशोधकांनी सरत्या वर्षातच लावला हेदेखील लक्षात घ्यायला हवे. या विषाणूमुळे माणूस नावाचा प्राणी अधिक शहाणा झाला आहे असे म्हणता येईल का, याचे उत्तर मात्र सध्या तरी, बहुदा नाही, असेच द्यावे लागेल. कोरोनाची निर्मिती ही माणसाच्या उतावळ्या स्वभावामुळे झाली हे नाकारता येणार नाही. येणारे नवे वर्ष आपल्या सोबत थोडीशी शहाणीव, परस्पर सौहार्द आणि भाईचार्याचा ठेवा घेऊन येईल, अशी अपेक्षा आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …