चिमुरड्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नांगुर्ले येथे शिबिर
कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील बालकलाकारांना हक्काचं व्यासपीठ देणार्या उत्कर्ष इव्हेंट्स आयोजित बालोत्सव 2021 चा मंगळवारी (दि. 9) शुभारंभ करण्यात आला. हा बालोत्सव चार दिवस चालणार असून, त्याला चिमुरड्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बालोत्सवानिमित्ताने कर्जत तालुक्यातील नांगुर्ले येथील जुरासिक फार्ममध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकार संदीप चार्ली यांच्या हस्ते नटराजचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या वेळी प्रदीप गोगटे, समिधा ठाकूर, पूनम घडसी – सुर्वे, प्रगती गुरव, मानसी जाधव, पूनम बंदरकर आदी उपस्थित होते. या शिबिरात अभिनय, गायन, डान्स, क्राफ्टिंग, पेंटिंग आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वेळी संदीप चार्ली यांनी चार्ली विथ मॅजिक शो सादर करून बच्चे कंपनीची चांगलीच करमणूक केली.
या शिबिरात अभिनयावर प्रदिप गोगटे, रंगभूषेवर अभय शिंदे, अभिवाचनवर जान्हवी अस्लेकर, देवेन्द्र शिंदे, ज्ञानेश्वर नाईक आणि पेंटींगवर सिद्धांत साळवी मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरातील बालकलाकार आणि प्रसिद्ध कलाकार मिळून 14 नोव्हेंबरला कर्जत शहरातील रॉयल गार्डन येथे ‘सूनहरा भारत आजादी के 75 साल’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाने शिबिराची सांगता होणार आहे.
या शिबिरासाठी काजल गुप्ता, माधुरी गोगटे, बाबू सकपाळ, सार्थक घरलुटे, प्रथमेश जाधव, कौशिक वांजळे, मितेश कोळी, वरुण मुसळे, ओमकार आरेकर, सारिका कासार हे सहकार्य करीत आहेत.