पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 29) संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उलवे नोडे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सभेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूमती घरत यांना उत्कृष्ट प्राचार्य, हेमंत कोळी यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि नंदेश पाटील यांना आदर्श शिक्षकेतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल दिल्लीचे नामांकन नुकतेच जाहीर झाले. यामध्ये जनार्दन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सीकेटी विद्यालयातील इयत्ता बारावी सायन्सची विद्यार्थिनी दीक्षा मनोज सोनार दिग्दर्शित व अभिनित, पर्यावरण आधारित सीएफसी अ कर्स या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याबद्दल दीक्षा सोनार आणि ओम सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर अनिल भगत, संजय भगत, प्रकाश भगत, संजय पाटील, वसंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, अर्चना ठाकूर, सदस्य सचिव सिद्देश्वर गडदे, शाखा प्रमुखांच्या प्रतिनिधी राज अलोनी आदी उपस्थित होते.