Breaking News

नव्या दशकातील लंबी रेसचे घोडे कसे शोधणार?

नवनवे उच्चांक प्रस्थापित करणार्‍या शेअर बाजाराने नव्या दशकाच्या नव्या आशा निर्माण केल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे महत्त्व प्रचंड वाढणार असलेल्या या दशकात ‘लंबी रेस के घोडे’ असलेल्या कंपन्या शोधणे म्हणूनच महत्त्वाचे ठरणार आहे.

2020 हे वर्ष जागतिक शेअर बाजारांसाठी दणक्याचं ठरलं. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत बाजारांनी नवनवे उच्चांक नोंदवले, तर फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत न भूतो न भविष्यती घसरणदेखील अनुभवास मिळाली, मात्र याच घसरणीमुळे अनेक नवीन गुंतवणूकदार जन्माला घातले. पुन्हा बाजाराने वर्ष संपता संपता मागील उच्चांकांवर बाजी मारली आणि वर्षाचा आणि एकूणच दशकाचा शेवट गोड केला. आता या 2021पासून सुरू होऊन 2030 साली संपणार्‍या दशकासाठी जर शेअर बाजारातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याबाबत जागरूक राहणं व संधी साधणं क्रमप्राप्त ठरतं. त्या दृष्टीनंचं हा लेखाजोखा. आता पुढील 10 वर्षांचा विचार केल्यास पुढील 10 वर्षे टिकणार्‍याच कंपन्या गुंतवणुकीसाठी निवडल्या पाहिजेत हे ओघानंच आलं.

मोतीलाल ओसवाल यांच्या वेल्थ क्रिएशन स्टडीमध्ये म्हटल्याप्रमाणं शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रामुख्यानं लोकप्रिय असे दोन दृष्टिकोन आहेत, टॉप-डाऊन आणि बॉटम-अप. टॉप-डाऊन प्रकारची सुरुवात म्हणजे आधी अर्थव्यवस्था व बाजार यांचं विश्लेषण, त्यानंतर कोणती क्षेत्रं अर्थव्यवस्थेस पूरक आहेत आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये जास्त वाढ अपेक्षित आहे हे जोखणं. पुढे अशा क्षेत्रांमधूनच उत्तम कंपन्या निवडण्याचं आव्हान गुंतवणूकदारांसाठी असतं. उत्तम म्हणजे सर्वार्थानं उत्तम, म्हणजे बाजारास मात देणार्‍या कंपन्या निवडणं. म्हणजे बाजारात तेजी असताना आपल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव हे तुलनेनं जास्त प्रमाणात वाढले पाहिजेत, मात्र समजा बाजारात घसरण झाली तरी बाजारातील घसरणीपेक्षा आपल्या कंपन्यांच्या भावातील घसरण तुलनेनं कमीच असली पाहिजे. म्हणून हे खरोखरीच एक आव्हान असतं, कारण गुंतवणूक ही केवळ शास्त्र नसून कलादेखील आहे. याउलट बॉटम-अप प्रकार म्हणजे आधी कंपन्यांचं विश्लेषण करणं म्हणजे कंपन्यांचे व्यवसाय व त्यांचा आर्थिकरीत्या अभ्यास करणं. या ठिकाणीदेखील अर्थव्यवस्थेचा सारासार विचार करूनच वाढीच्या क्षेत्रामधील कंपन्यांचा विचार केला जाऊ शकतो, परंतु अर्थव्यवस्थेचा या कंपन्यांवर काय परिणाम होऊ शकतो या दृष्टिकोनातून.

आता पुढील दशकाचा विचार करता आपला दृष्टिकोन प्रगल्भ असणं किंवा दूरदृष्टी असणं गरजेचं असतं. त्यामुळं केवळ देशांतर्गत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हे संकुचित ठरू शकतं. आता खुली बाजारपेठ, अत्युच्च तंत्रज्ञान व सरकारी धोरणांमुळं आपण जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेत बोली लावू शकतो आणि पर्यायानं तेथील उत्तम कंपन्यांमध्येदेखील. त्यामुळं बहुतेक सुजाण जागतिक गुंतवणूकदार टॉप-डाऊन दृष्टिकोन पाळताना आढळतात. याचं कारण म्हणजे जगभरातील कोणत्या देशाची अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करेल यावरदेखील त्या देशातील शेअर बाजाराचा परतावा ठरू शकतो, अन्यथा कोणत्या तरी विचित्र धोरणामुळं स्थानिक चलनाची तीव्र घसरण झाल्यास त्याचा फटका त्या देशातील गुंतवणूक व्यवस्थेस बसून पर्यायानं भांडवलाचा नाश होण्याचा धोका उद्भवू शकतो.

अर्थव्यवस्थेच्या व बाजाराच्या विश्लेषणासाठी अर्थव्यवस्थेच्या बोधदर्शक गोष्टी, विशिष्ट व्यावसायिक चक्राची अवस्था, बाजाराची मानसिकता समजणं गरजेचं ठरतं. त्यानंतर उद्योगांची जडणघडण, त्यामधील स्पर्धात्मक फायदा आणि इकनॉमिक मोट. ज्याप्रमाणं शत्रूला प्रतिरोध करण्यासाठी किल्ल्यांभोवती खंदक खणला जायचा अगदी त्याचप्रमाणं ज्या योजना कंपनीचा स्पर्धात्मक फायदा कमी होऊ नये यासाठी आखल्या जातात त्यालाच इकनॉमिक मोट म्हटलं जातं. त्याचा उपयोग स्पर्धक कंपन्यांसमोर दीर्घकालीन नफा आणि बाजारातील हिस्सेदारी संरक्षित करण्यासाठी व स्पर्धक कंपन्यांवर स्पर्धात्मक फायदे राखण्याची क्षमता ठेवण्यासाठी होतो.

आता या सर्व गोष्टी वाचून शेअर बाजारातील गुंतवणूक हा विषय किचकट वाटू शकतो, परंतु खरंतर शेअर बाजारातील गुंतवणुकीचं सार म्हणजे जिथे मूल्य-भावात अंतर आहे अशा निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणं आणि विसरून जाणं.  वॉरेन बफेटनी म्हटलेलंच आहे, भाव म्हणजे जो आपण देत असतो आणि मूल्य म्हणजे जे आपल्याला मिळत असतं. त्यामुळंच कंपन्यांमध्ये दडलेली योग्य मूल्य शोधणं ही एक कलाच आहे. कारण बाजारातील त्या कंपनीच्या शेअर्सना दिला गेलेला भाव हा सर्वज्ञात असतोच, परंतु कोणत्या भावात कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं यावरच आपल्या गुंतवणुकीचं भवितव्य अवलंबून असतं आणि इथंच खरी मेख असते आणि म्हणूनच म्हटलं जातं की, शेअर बाजार ही अशी एक जागा आहे जिथं लोकांना प्रत्येक कंपन्यांचे भाव माहीत असतात, परंतु त्यांची मूल्ये ठाऊक नसतात आणि त्यामुळंच कोणत्याही (सर्वोच्च अथवा न्यूनतम) भावामध्ये व्यवहार होत असतात.

सर्वोच्च भाव असला तरी अधिक हव्यासापोटी लोक त्यावर तुटून पडतात, तर अत्यंक कमी असलेला दर अजून कमी व शून्य होईल या भीतीनं कमी किमतीतही विकण्यासाठी चढाओढ लावतात. त्यामुळं जरी बाजारभाव जगजाहीर असला तरी मूल्य हे वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या मनातच असतं हेच खरंय. मागील अनेक लेखांत नमूद केल्याप्रमाणं कंपन्यांचं मूलभूत विश्लेषण करताना अनेक रेश्यो, पद्धती, परिमाणं वापरून कंपन्यांची मूल्यांकनं काढताही येतात, परंतु प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांची मूल्ये वेगवेगळी असू शकतात. अगदी या गोष्टीवरही मात केल्यास योग्य प्रकारे अभ्यासानं घेतलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयावर वर्षानुवर्षे ठाम राहणं हेही महत्त्वाचं ठरू शकतं. कारण बर्‍याच वेळा आपण घेतलेल्या उत्तम कंपन्यांच्या शेअर्सचे भाव अनेक दिवस वाढत नाहीत, परंतु एखाद्या लहानशा

किरकोळ कंपन्यांच्या शेअरचे भाव थोड्याच कालावधीत काहीपट होताना पाहिल्यावर आपली मनस्थिती बदलून आपण आपल्याच घोड्याला दोष देतो व दशकाच्या अवधीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून काही महिन्यांतच बाहेर पडून पळत्याच्या मागं लागून एखाद्या सुमार कंपनीचा शेअर घेऊन नंतर पश्चाताप करतो. हरीण कितीही चपळ असलं तरी त्याची कुवत काही फर्लांग धावण्याचीच असते, मात्र घोडा न थकता मैलोन्मैल धावू शकतो, हीच गोष्ट गुंतवणुकीतही. आपण ठरवायचंय आपल्याला सरडा निवडायचाय की लंबी रेस का घोडा.

सुपर शेअर : जेएसडब्ल्यू स्टील

मागील आठवड्यात जिंदाल समूहातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या शेअरचा भाव साडेसहा टक्क्यांनी वाढला. जेएसडब्ल्यू स्टीलने परदेशातील रोखे विक्रीतून 250 दशलक्ष डॉलर्स उभे केलेले आहेत. त्याचबरोबरीनं गेल्या काही वर्षांत पोलाद निर्माण व्यवसायामध्ये मंदीसदृश वातावरण होतं आणि त्याचा परिणाम म्हणून स्टील कंपन्यांच्या शेअर्सनादेखील फारशी मागणी नव्हती, परंतु जागतिक टाळेबंदीनंतर गेल्या सहा महिन्यांपासून हे चित्र बदललेलं पाहायला मिळतंय. जागतिक बाजारात स्टीलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे, कारण चीननं त्यांच्या देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची अपेक्षा नाही आणि जागतिक बाजारात इतर कोणतेही महत्त्वपूर्ण निर्यातदार नसल्यानं मागणी पुरवठा साधण्यासाठी भारतीय स्टील कंपन्यांकडं पाहिलं जातंय आणि त्यामुळंच स्टीलची एकूण मागणी आणि स्टील उद्योगाच्या कामगिरीबाबत भारतीय कंपन्या आशावादी आहेत. त्याच अपेक्षेनं देशातील बहुतांश स्टील उत्पादकांच्या क्षमतेचा उपयोग सुधारला आहे आणि त्यांच्याकडे तगड्या ऑर्डर्स आहेत. चीन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या भौगोलिक राजकीय मुद्द्यांमुळे कोळशाचे दर नरम झाले आहेत. परिणामी जागतिक बाजारपेठेत ऑस्ट्रेलियाहून अधिक कोळसा उपलब्ध असल्यानं आणि कोळशाची मोठी आयात करणारा भारतातील दरांमध्ये घट होत असल्यानं ही गोष्ट स्टील कंपन्यांचे मार्जिन्स सुधारण्याच्या दृष्टीनं पथ्यावरच पडेल असं वाटतं.  तांत्रिकदृष्ट्या मार्च महिन्याच्या तळापासून विचार केल्यास याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या वाढीपेक्षा सलग वाढ दर्शवतो. जेएसडब्ल्यू स्टीलला सध्या 390 रुपयांवर अडथळा वाटत असून पडत्या भावात खरेदी केल्यास दीर्घ मुदतीसाठी 440 हे उद्दिष्ट गृहीत धरता येऊ शकते.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply