इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका आहे. या दोन दहशतवादी संघटनांकडून भारतात हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यूझीलंडच्या मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी हे हल्ले घडवून आणले
जाऊ शकतात. ज्यू स्थळांवरसुद्धा हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांत हल्ले होऊ शकतात, असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. दहशतवादी वाहन किंवा धारदार शस्त्रांचा हल्ल्यासाठी वापर करू शकतात. गुप्तचर यंत्रणांनी मुंबईतील इस्त्रायली दूतावास, प्रार्थनास्थळे आणि छाबड हाऊस येथे बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी आपले सर्व लक्ष दहशतवादी कारवायांना आळा घालण्याकडे केंद्रित केले आहे. अनेक वेळेला देशातील काही उपद्रवी लोकही रिकामटेकडा उद्योग म्हणून किंवा सुरक्षा यंत्रणांना घाबरविण्यासाठी अमुक एखाद्या ठिकाणी बॉम्ब किंवा घातक वस्तू ठेवल्या असल्याचे निनावी दूरध्वनी कॉल करीत असतात. अशा वेळी सुरक्षा यंत्रणाही कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता आलेल्या प्रत्येक दूरध्वनी कॉलचा सखोल तपास करून मागोवा घेत असतात. न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आयसिसशी संबंधित सेल हल्ला घडवून आणू शकतात. यासंबंधीचा पहिला अलर्ट 20 मार्च रोजी देण्यात आला. ख्राईस्टचर्च येथे ब्रेनटॉन टॅरॅन्ट या ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याने न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे न्यूझीलंडमध्ये हाहाकार उडाला होता.
आयसिसचा प्रवक्ता अबू हसन अल मुजाहिरच्या भाषणाचा ऑडिओ काही ऑनलाइन ग्रुप आणि चॅट प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. त्यामध्ये तो आपल्या समर्थकांना न्यूझीलंडच्या मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्याचे आव्हान करीत आहे. प्रार्थनास्थळाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आमचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी सांगितले आहे. ज्यूंची प्रार्थनास्थळे आणि रहिवासी वसाहतींवर अल कायदाकडून हल्ला होऊ शकतो, यासंबंधीचा दुसरा अलर्ट 23 मार्च रोजी मिळाला आहे. गोव्यामध्ये काही खास ठिकाणांचा उल्लेख यात करण्यात आला आहे. पारंपरिक शस्त्रे न वापरता वेगळ्या पद्धतीने हा हल्ला घडवून आणला जाऊ शकतो. या इनपुटनंतर महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.