Breaking News

लॉकडाऊननंतरचे माथेरान!

मुंबई आणि पुणे या महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी 90-100 किलोमीटर जवळ असलेले वाहनमुक्त, प्रदूषणमुक्त आणि सध्या कोरोनामुक्त असलेले माथेरान हे ब्रिटिशकालीन निसर्गरम्य थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. कोरोनामुक्त माथेरानला पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देत असून पर्यटनावर 100 टक्के अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये सात महिन्यानंतर पुन्हा पर्यटन फुलू लागले आहे. दरम्यान, वाहनांना बंदी असलेल्या या पर्यटन स्थळावरील वनराई ही सर्वांना ऑक्सिजन पुरवीत असते, त्यामुळे प्राणवायू घेण्यासाठी पर्यटक माथेरानला पसंती देत आहेत.

माथेरान म्हणजेच डोंगर ’माथ्यावरील रान’ हे वृक्षाच्छादित असलेले समुद्रसपाटीहून 803 मीटर उंचीवर असलेलले एक थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. माथेरान हे वृक्षाच्छादित असल्याने येथे प्राणवायू (ऑक्सिजन) हा भरपूर प्रमाणात आहे.त्यामुळे येथे रानावनातील लाल पायवाटेच्या रस्त्यावरून पायी रपेट मारली की फुफ्फुसे चांगली कार्यरत होऊन शरीराला पुरेपूर ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात माथेरानचे पर्यटन हे आरोग्यदायी असून स्वास्थ्ययुक्त असेच आहे.कोरोनामुळे मुंबई आणि पुणे तसेच राज्यातील सर्व नागरिक तब्बल सहा महिन्यांच्या लॉकडाऊन मुळे हवालदिल झाले आहेत. देश विदेशात कोरोनाच्या दुसर्‍या संसर्ग लाटेच्या शक्यतेमुळे देशविदेशात अतिखर्चीक दौरा करून आरोग्याचा धोका पत्करून जाण्याचे नागरिक टाळत आहेत.अशावेळी प्रदुषणमुक्त, वाहनमुक्त, कोरोनामुक्त तसेच ऑक्सिजनयुक्त आणि स्वास्थ्ययुक्त माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांना पर्यटनासाठी तसेच आरोग्यासाठी नक्कीच भुरळ घालणारे ठरणार आहे.

अनलॉक झाल्यानंतर नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा आणि स्वास्थ्य लाभणारे पर्यटनस्थळ माथेरान हे पहिल्या पसंतीचे पर्यटन स्थळ ठरत आहे. सन 1850 मध्ये ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ’सर ह्युज पॉईंट्झ मँलेट यांनी माथेरानचा शोध लावला. तदनंतर मुबंई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी 1856-57 सालापासून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ दिले.त्यांनी स्वतः एकूण 36 एकराचा प्लॉट घेऊन ’एल्फिन्स्टन लॉज’ हा स्वतःचा बंगला माथेरानला त्याकाळी बांधला. ’माळरान ते माथेरान’ आणि आता ’मुबंईचे नंदनवन’ अशी ख्याती त्याकाळी माथेरानची राज्यात, देशात आणि परदेशात सुद्धा पोहचली होती.

सन 1900च्या सुमारास माथेरानच्या ख्यातीत अनेक पटींनी भर पडली. आणि माथेरानला अनेक प्लॉट त्याकाळी लीजने अनेक ब्रिटिश अधिकारी व उद्योगपतींनी घेतले.कारण एक रोगराईमुक्त, प्रदुषणमुक्त, आल्हाददायक थंड हवेचे राहण्याचे उत्तम ठिकाण म्हणून माथेरानला येथील वाहनांच्या किलबिलाट अभावी प्रथम प्राधान्य देत आहेत.

आजच्या 2020 सारखी परिस्थिती 1896 ते 1899 या कालखंडात आली होती आणि प्लेग या संसर्गजन्य रोगाचे थैमान मुबंई व पुणे येथे चालू होते. अनेक माणसे या प्लेगच्या संसर्गजन्य साथीत दगावत होती. पण माथेरानला त्याकाळी रोगराई नव्हती आणि अनेक ब्रिटिश सनदी अधिकारी व उद्योगपती आपल्या कुटुंबांसह मुंबई-पुणे येथून माथेरानला उत्तम आरोग्य लाभण्यासाठी प्रथम प्राधान्य देत येऊन रहात होती. सध्या कोरोना काळात लॉकडाऊनचे जे कायदे व नियम वापरले ते सन 1896 रोजी ब्रिटिशांनी याच प्लेगच्या महामारी रोगासाठी बनविले होते.सन 1907 रोजी सर आदमजी पिरुभाँय यांनी 21 किमी अंतरावर नेरळ-माथेरान असा नॅरोगेज रेल्वेमार्ग शोधून मिनी ट्रेन सुरू केली. त्यामुळे येथील पर्यटनामध्ये विलक्षण क्रांती घडून आली.या मिनीट्रेनला ’फुलराणी’ आणि माथेरान राणी असे ही संबोधिले जाते.तेव्हापासून ही मिनी ट्रेन माथेरानची ’लाईफलाईन’ (जीवन वाहिनी) म्हणून ओळखली जाते. कारण पर्यटन आणि त्यावर आधारित व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन माथेरानचे आहे. मिनी ट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण बिंदू असल्याने येथील पर्यटन बहरते. सध्या सर्वसामान्य जनतेसाठी मध्य रेल्वेची लोकल चालू नसल्याने येथे येणारे प्रवासी स्वतःचे वाहन घेऊन थेट माथेरानला दस्तुरी कार पार्किंग पर्यन्त येऊ शकतात. तसेच नेरळ ते माथेरान अशी पाच माणसे बसू शकतील अशी टॅक्सी सेवासुद्धा उपलब्ध आहे. माथेरानला आल्यावर दस्तुरीच्या पुढे अमनलॉज हे रेल्वे स्टेशन आहे. येथून माथेरान स्टेशनला येण्यासाठी सध्या मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या 6 फेर्‍या तासाभराच्या अवधीने अमनलॉज स्टेशनवरून चालू आहेत.

कोविड19 ची भीती न बाळगता पर्यटक मनसोक्त माथेरान मध्ये निसर्गाचा आनंद घेत आहेत.मात्र नगरपालिकेने प्रवेशद्वारात ऑक्सीजन तपासणी व थर्मल स्क्रीनिग तपासणी सोय केली असल्यामुळे पर्यटक निर्भीड पणे फिरत आहे मात्र शासनाच्या गाईड लाईन नुसार सुरुवातीला पर्यटक संख्या कमी होती म्हणून मिनिट्रेन च्या फक्त दोन फेर्‍या होत्या. मात्र जसा पर्यटकांचा वाढता ओघ आणि मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे ने तब्बल 14 फेर्‍या केल्याने पर्यटकांची गैरसोय होत नसून आबालवृद्ध मिनिट्रेन शटलसेवेचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

समृद्ध पर्यटन

नेहमी पर्यटकांच्या गर्तेत असणारे माथेरान 17 मार्च रोजी पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. 23 मार्चला सर्वत्र लॉकडाऊन लागला. आणि माथेरान स्तब्ध झाले. नेहमी पर्यटकांचा आरडाओरडा, धमाल मस्ती हे सर्व दिसेनासे झाले आणि माथेरानकर आर्थिक विवंचनेत सापडले. जसजसे दिवस जाऊन लॉकडाऊन उठून माथेरान पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. हळूहळू पर्यटक वाढू लागले. आणि माथेरान बहरात येऊ लागले. 2 सप्टेंबर रोजी माथेरान सुरू झाले. जसजसे पर्यटकांना माथेरान सुरू झाल्याचे बातमी पसरू लागली त्यानंतर माथेरानमध्ये पुन्हा धमाल, मस्ती, शोरशराबा पहावयास मिळत आहे. लोकल ट्रेन बंद असूनही पर्यटक माथेरानकडे वळत आहेत. स्वतःची गाडी नसली तरी ओला, उबेर या गाड्या भाडेतत्वावर घेऊन माथेरान मध्ये क्षणिक विश्रांती साठी येत आहेत. दिवसेंदिवस माथेरान पर्यटकांनी बहरलेलं दिसत आहे.

माथेरानमध्ये काय पाहू शकता…

सात पॉइण्ट सर्कल, (अलेक्झांडर ते बेल्विडियर पॉइण्ट) बारा पॉइण्ट सर्कल, (एक्को पॉइण्ट ते सनसेट पॉइण्ट), शारलोट लेक, माधवजी पॉइण्ट, नवरोजी लॉर्ड गार्डन, पेमास्टर्स पार्क आदी खास करून नव्याने सुशोभित होत असलेला पॅनोरमा पॉइण्ट म्हणजे सनराईज पॉइण्ट. येथून सूर्योदय पाहणे अगदी विलक्षण असते. सर्व पिकनिक स्थळे पाहण्यासाठी घोड्यांची सवारी तसेच हातगाडी रिक्षा उपलब्ध आहे. यांचे दरभाडे नगरपरिषदेने नियमित केले आहेत. तेव्हा त्याप्रमाणेच पर्यटकांनी ते दरभाडे देण्याचा कटाक्ष पाळावा.एक्को पॉइण्टजवळ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवानावर स्थित असे स्फूर्तिदायक वस्तूसंग्रहालय आहे. मुख्य बाजारामध्ये लेदरच्या वस्तू, टोपी, चप्पल, चिक्की, मध, माथेरानचा रानमेवा पर्यटक खरेदी करू शकतात. माथेरान या पर्यटनस्थळाला नक्कीच आवर्जून भेट द्या आणि काही काळ निसर्गाच्या सानिध्यात घालवून आपले आरोग्य ही सदृढ ठेवा, त्यासाठी आपल्या संस्कृतीत आणि साहित्यात लिहिलेच आहे, आरोग्यम धन संपदा! तेव्हा स्वच्छ व प्रदूषण विरहित वातावरण असलेल्या निसर्ग रम्य पर्यटन स्थळाला भेट देऊन दोन-चार दिवस वास्तव्य करून पर्यटना बरोबरच आरोग्य ही सांभाळा.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply