Breaking News

महालसीकरण मोहीम

गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांना ज्याची प्रतीक्षा होती ती कोरोना प्रतिबंधक लस अखेर उपलब्ध झाली आहे. वैश्विक महामारी कोरोनावरील देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाला. त्यामुळे कोविड-19 विषाणूविषयीचे उरलेसुरले भयही संपुष्टात आले आहे. नववर्षाची याहून चांगली सुरुवात काय असू शकते.

कोरोना या तीन अक्षरी महामारीने मानवी जीवन पार बदलून गेले. गेल्या वर्षी या संकटाचा प्रादुर्भाव चीनमधून जगभर झाला आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण वर्ष कोरोनामध्येच गेले. या काळात सारे काही ठप्प झाले होते. हळूहळू परिस्थिती सामान्य होत चालली आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांमध्ये मात्र अद्यापही दिलासा मिळू शकलेला नाही किंबहुना तेथील परिस्थिती अधिकच भयंकर बनली आहे. कोरोनाची दुसरी लाट, नवा विषाणू यामुळे हे बडे देश अजूनही झुंजतच आहेत. त्या तुलनेत भारताने कोरोनावर मिळविलेले नियंत्रण नक्कीच कौतुकास्पद म्हटले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच लागू केलेले कठोर निर्बंध, नागरिकांना दिलेली हिंमत-प्रोत्साहन, राबविलेल्या उपाययोजना, सर्व घटकांसाठी लागू केलेले पॅकेज हे सर्व सक्षम नेतृत्व काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. लसीकरण मोहिमेतही त्यांनी जातीने लक्ष घातले. भारत आणि भारतीयांकडून विकसित केल्या जात असलेल्या विविध लशींची माहिती पंतप्रधान मोदी सातत्याने घेत होते. या संदर्भात त्यांनी संबंधित कंपन्यांचे दौरे करून आढावासुद्धा घेतला तसेच संपूर्ण देश हा वैज्ञानिक-शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाहीदेखील दिली. अखेर सामुदायिक प्रयत्नांना यश आले आणि देशात महालसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सध्या दोन लस दिल्या जात आहेत. एक म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हीशील्ड, तर दुसरी भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सीन. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोराना योद्ध्यांना प्राधान्य असेल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. या लसीकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिली लस ही राजधानी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये एका सफाई कर्मचार्‍याला टोचली गेली. या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन उपस्थित होते. सफाई कर्मचारी मनीष कुमार याने लस घेतल्यानंतर लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. हा बोलका अनुभव खूप काही सांगून जातो. लसीकरणापूर्वीच काही विरोधकांनी शंका उपस्थित करीत या मोहिमेत खो घालण्याचा प्रयत्न केला होता. आताही नतद्रष्ट मंडळी दिशाभूल करणारी वक्तव्ये करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, मात्र त्यातून काही साध्य होणार नाही. देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्व्हेमधून देशातील लोक पंतप्रधान मोदींच्या कामकाजावर समाधानी असल्याचे अधोरेखित झाले आहे. एवढेच नव्हे तर देशात जर आता निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च विजयी होईल, असा बहुतांश लोकांना विश्वास आहे. यावरून मोदी सरकारवर लोक खुश आहेत हे स्पष्ट होते. म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होत असलेली जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम यशस्वी होईल यात शंका नाही. नव्या वर्षात कोरोना संकट पूर्णपणे दूर व्हावे हीच अपेक्षा!

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply