आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांची माहिती
खालापूर ः प्रतिनिधी
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. तसेच खालापूर तालुक्यात फेब्रुवारीत लसीकरण होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांनी दिली. कोरोना संसर्गात रायगड जिल्ह्यात खालापूर तालुका हॉटस्पॉट बनला होता. येथील कोरोनाबाधितांचा आकडा 2800च्या घरात, तर 130च्या आसपास मृत्यू झाले आहेत.
पनवेलनंतर सर्वाधिक कोरोनोबाधित आणि मृत्यू खालापूर तालुक्यात झाले आहेत.त्यामुळे खालापूर तालुक्याला लसीकरणात प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु खालापूर तालुक्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लस मिळणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद रोकडे यांनी दिली. खालापूर तालुक्यातील जवळपास 120 जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असून, 125 आशा वर्करनादेखील फेब्रुवारीत लस देता येईल का याची चाचपणी सुरू आहे.
कोरोना काळात अखंडित सेवा देणार्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच पोलीस विभागाला लसीकरणात प्राधान्य आहे, परंतु लस कशी उपलब्ध होते त्यावर सर्व अवलंबून आहे. एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल.
-डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी, खालापूर