पोलादपूर तालुक्यातील कोंढवी परिसरातील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाण मंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्ड्यातील माती उपसण्यात आली. या मातीच्या ढिगार्यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मूर्ती आढळून आल्याने तालुक्यात या घटनेमुळे भाविकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी राज्य सरकारने या पवित्र क्षेत्राला तीर्थक्षेत्र वा यात्रास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. पूर्वापार ऐतिहासिक स्थळ असूनही उपेक्षित असलेल्या या कोंढवी किल्ल्यानेच जणू या पाषाण मूर्ती सापडल्यानंतर पर्यटन विकासासाठी सरकारला साद घातली आहे असे जाणवत आहे.
आदिलशाहीतील सरदार फौलादजंगाच्या यवनी सत्तेत कोंढवीची ग्रामदेवता श्रीजननीआई कुलूपबंद अवस्थेत पूजाअर्चेविना बंदिस्त होती. हे पाहून चिपळूण येथील भैरवनाथांनी आपल्या या बहिणीच्या मुक्ततेसाठी धाव घेतली अन् हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना बळ देत कोंढवी किल्ल्यावरील यवनी सत्तेला पूर्णपणे पिटाळून लावले. पुढे फौलादजंगाला पोलादपूरच्या श्रीकाळभैरवनाथाच्या छत्रछायेतील समशेर सरदार या सोनाराने जमीनदोस्त केल्याची आख्यायिका ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळते, तर दुसरीकडे कोंढवी किल्ल्याचा इतिहास समर्थ रामदास स्वामी यांच्या रामदास आणि रामदासी प्रकरणातील 29व्या भागामध्ये ’कोंढवी परगण्याचा करिना’ या ऐतिहासिक टिपणेमधील ’टिपण दुसरे’मध्ये कथन करण्यात आला आहे. जीव वाचविण्यासाठी पळणार्या चंद्रराव मोरे यांचा पाडाव करण्यात आल्याच्या या प्रकरणामध्ये यवनी सत्तेचाही उल्लेख आहे. भारतात कोठेही नसलेले वेताळ आणि मारुतीरायाचे एकाच पाषाणातील स्थान केवळ आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिरालगत पाहण्यास मिळते.
रायगड जिल्ह्यातील पहिले शहीद या कोंढवी किल्ल्याच्या आठगाव भैरवनाथाच्या छत्रछायेमधील खडपी येथील सयाजी जाधव असून फणसकोंडचे अनाजी चव्हाण, लक्ष्मण महादेव निकम आणि भरत अमृतराव निकम हे कोंढवी गावातील शहीद जवान लढवय्यांची परपंरा असल्याचे द्योतक असल्याची माहिती सेवानिवृत्त सैनिक भार्गव निकम यांनी दिली.
देवस्थानाचे परंपरागत पुजारी अशोक गुरव यांनी जननीआईच्या मंदिरापासून सुटलेल्या रेड्याने कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांमध्ये जाऊन मग देऊळमाळावरील उघडा मारुती व वेताळ महाराजांसमोरील पायर्यांवरून प्रस्थान करीत असताना सातव्या पायरीवर रेड्याचा वध करण्यात आला. त्यामुळे रेड्याने वास्तव्य केलेली ही आठ गावे या भैरवनाथांचे क्षेत्र मानले जात आहे. पूर्वी दर तीन वर्षांनी हा रेडा जननीआईच्या मंदिरापासून सोडला जाऊन या सातव्या पायरीवर वध करून त्याचे रक्त व मांस यांचे मान दिले जात होते. भातासोबत रक्त कालवून ते देऊळमाळावर पेरण्यासाठी उधळल्यानंतर प्रत्यक्षात ते जमिनीवर पडलेले कधीही कोणास दिसले नसल्याची प्रचिती प्रत्येक वेळी ग्रामस्थांनी घेतली आहे. कालांतराने रेड्याचा दर तीन वर्षांनी वध करण्याची प्रथा बंद झाली असून आता काळ्या रंगाचा एकरंगी बकरा शोधून ही प्रथा पूर्ण केली जात असल्याची माहिती दिली. या श्रीदेव भैरवनाथाच्या देवस्थानाचे जागृत स्वरूप येथे विंचू व सर्पदंश झालेला रुग्ण आणून ठेवल्यानंतर तो बरा होत असल्याची प्रचिती येत असल्यावरून अनुभण्यास आले आहे. या देवस्थानाकडे नोकरी व अन्य कारणांसाठी केलेल्या नवसाची फलप्राप्ती होत असल्याचे या वेळी पुजारी अशोक गुरव यांनी सांगितले.
या जागृत आठगाव भैरवनाथ देवस्थानाची प्रचिती या छत्रछायेतील भाविकांनी नेहमीच घेतली असताना अन्यत्र सर्वदूर पसरलेल्या भाविकांपर्यंत प्रसिद्धी होऊन त्यांना या देऊळमाळावर येण्याची व्यवस्था होण्यासाठी या देवस्थानापर्यंत रस्ता, पाणी, वीज, मंदिराचे सभागृह आणि गाभारा यांचे नूतनीकरण करून भाविकांना येथे देवदर्शनासोबतच सोयीसुविधाही देण्याचा मानस असल्याने सुमारे दीड कोटी रुपये अंदाजे खर्चाचे पाषाणाचे नवीन मंदिरासाठी हेमाडपंथी स्वरूपाचे चिरेबंदी बांधकाम करण्याचा संकल्प केल्यानुसार बांधकामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती दिली. या बांधकामासाठी पाणी साठविण्याकामी मंदिराच्या डोंगरउताराला एक खड्डा खणण्यात आला असता नरसिंहमंदिर कन्स्ट्रक्शन लातूर येथील बांधकाम व्यावसायिकांच्या कामगारांना या खड्ड्यातील मातीचा उपसा केलेल्या ढिगार्यामध्ये काही पाषाणाच्या मूर्ती आढळून आल्याने कामगारांनी त्या वेचून मंदिरासमोरील प्रांगणात मांडल्या. या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासोबतच तीर्थक्षेत्र वा यात्रास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केली आहे, मात्र सरकारी अधिकारी आणि अन्य पर्यटनविषयक यंत्रणांनी या मंदिरासह कोंढवी किल्ल्याच्या परिसराकडे अद्याप सपशेल दुर्लक्ष केल्याचे सातत्याने दिसून आले आहे.
-शैलेश पालकर, खबरबात