राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा
अलिबाग ः प्रतिनिधी
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी व अपंग सेवा संस्था चिपळूण यांच्यातर्फे चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने विजेतपद पटाकावले. रत्नागिरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेतील रायगडचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात रायगडने रत्नागिरीचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरीने आठ षटकांमध्ये 76 धावा केल्या होते. रायगडने हे लक्ष्य 5.3 षटकांमध्ये पूर्ण करून सामना जिंकला. रत्नागिरीचा मंदार खैर याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. रत्नागिरीच्याच अजिंक्यला उत्कृष्ट फलंदाजाचे, तर रायगडच्या शैलेश पाटीलला उत्कृष्ट गोलंदाजीचे बक्षीस देण्यात आले. मंगेश जाधव (कर्णधार), शैलेश पाटील (उपकर्णधार), सहदेव बर्डे, हितेश पाटील, कल्पेश ठाकूर, विलास कदम, मुकेश पिंगळे, ॠषिकेश एस. पाटील, संदीप ठाकूर (सिनियर) संदीप ठाकूर (ज्युनियर), शकील उके, ओंकार महाडिक, नितीन महाबळे यांचा रायगडच्या संघात समावेश होता. मंगश दळवी रायगड संघाचे प्रशिक्षक होते. विजय लाड व राजेंद्र कांबळे यांनी संघाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी बजावली, तर महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.