Breaking News

फेसबुकद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढले

भावनिक मेसेज करून पैशांची मागणी; अनेकांची आर्थिक फसवणूक

पनवेल : वार्ताहर

फेसबुकवर असलेले अकाऊंट हॅक करून उपलब्ध असलेल्या डेट्या द्वारे फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.  कामोठे वसाहतीत अशाच एका प्रकारातून फसवणूक झालेल्या व्यक्तीने कामोठे पोलीस ठाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.

कामोठे वसाहतीत राहणारे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असलेले नरेंद्र गायकर यांच्या फेसबुकवरील अकाऊंटवर असलेली माहिती व फोटोचा वापर करून ऐका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गायकर यांच्या काही मित्रांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (दि. 19) घडली आहे.

अकाउंट हॅक करणार्‍या हॅकरद्वारे गायकर यांच्या अकाऊंट असलेल्या माहितीचा वापर केला. गायकर यांच्या मित्र यादीतील मित्रांना आपल्या ऐका सहकार्याच्या मुलीचे तत्काळ उपचार करायचे असल्याने पैश्यांची गरज असून आपण नेट बँकिंग च्या माध्यमातून तत्काळ पैसे पाठवावे असे आवाहन करण्यात आले. अशाप्रकारे फसवणूक केली जात असल्याची माहिती नसलेल्या अनेकांनी हॅकरद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अकाऊंटवर पैसे पाठवले. ही बाब गायकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दाखल केली. या घटनेचा कामोठे पोलिसांमार्फत पुढील तपास करण्यात येत आहे.

  हॅकरने बदलली भाषा

फेसबुक मसेंजर द्वारे फसवणूक करणारे हॅकर या पूर्वी पैसे मागणी करताना हिंदी भाषेचा वापर करत होते. मात्र हॅक करण्यात आलेले अकाऊंट मराठी भाषिकाचे असताना हा व्यक्ती हिंदीत का संवाद साधतो असा संशय आल्याने अनेक जण पुढे बोलणे टाळत असल्याचे लक्षात आल्यावर भाषा ट्रान्सलेटर चा वापर करून हिंदी मिश्रित मराठीमध्ये संवाद साधण्याचा नवा प्रकार या हॅकरसनी आत्मसात केला आहे.

  अशी केली जाते फसवणूक

फेसबुक प्रोफाइलवरील माहिती चोरून दुसर्‍यांच्या नावाने बनावट अकाऊंट सुरू करून मूळ व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करण्यात आल्यानंतर फेसबुक मेसेंजरवरून भावनिक मेसेज करून पैशांची मागणी करण्यात येते.

  व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संवाद

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारांमुळे सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत असून अशाप्रकारे पैशांची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करावी असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे फेसबुकवर असलेल्या फोटोचा वापर करून दुसर्‍याच अनोळखी क्रमांकच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर फोटो ठेऊन व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न फसवणूक करणारे करत आहेत.

माझ्या नावाने माझ्या सहकार्याकडून पैसे मागितले जात असल्याचे लक्षात येताच तत्काळ स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

-नरेंद्र गायकर, कामोठे

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply