Breaking News

100 ते 50000 सेन्सेक्सचा रोमहर्षक प्रवास

गुंतवणुकीला गेले 41 वर्षे उत्तम परतावा देणार्‍या शेअर बाजाराने 21 जानेवारी 2021 रोजी 50 हजार अंशाचा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याचा हा रोमहर्षक प्रवास…

परवाच घरी झालेल्या कौटुंबिक गेट-टूगेदरमध्ये सर्वांत जास्त चर्चिलेला विषय होता, तो म्हणजे शेअर बाजारामधील घोडदौड. मागील आठवड्यात आशियातील सर्वांत जुन्या बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्स या निर्देशांकानं मागील आठवड्यातील गुरुवारी, 50 हजारांचा टप्पा ओलांडला आणि भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात 21 जानेवारी 2021 हा दिवस नोंदला गेला. सेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्सचे संक्षिप्त रूप आहे. सेन्सेक्सची आधार किंमत ही 100, आणि त्यासाठी आधार वर्ष 1978-79 हे गृहीत धरून जानेवारी 1986 साली प्रकाशीत होऊन सुरू झालेला हा प्रवास मागील 41 वर्षांत लोकांना कमीत कमी पाच हजार पट परतावा देऊन गेलेला दिसतो. अगदी मागील वर्षी 25 हजारांवर आल्यानंतर माझ्या काही क्लायंट्सना त्यांच्या शंकेवर शेअर मार्केट बंद होणार नाही हे पटवून देताना माझ्या नाकीनऊ आले होते. आता त्याच लोकांचे पैसे मागील दहाच महिन्यांत काही पट झालेले दिसत आहेत.

अगदी प्राथमिक काळात, 1850 साली मुंबईच्या टाऊनहॉल समोरील वडाच्या झाडाखाली पाच दलाल एकत्र जमत होते (सध्याच्या शहीद भगतसिंग मार्गावरील हॉर्निमन सर्कल गार्डन). त्यानंतर 1860च्या दशकात तेव्हाच्या एस्प्लनेड मार्गावरील (सध्याचा महात्मा गांधी मार्ग) चौकात एकत्र जमण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दलालांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं अनेकदा त्यांना आपल्या जागा बदलाव्या लागल्या. अखेरीस या दलालांना कायमस्वरूपी ठिकाण आणि त्याचबरोबर 1875 मध्ये त्यांना अधिकृतपणे द नेटिव्ह शेअर स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन हे नाव मिळालं, जे पुढं जाऊन ’बाँबे स्टॉक एक्स्चेंज’ झालं. 1928 साली एक्स्चेंजनं ही जागा घेऊन 1930 मध्ये या इमारतीचं बांधकाम पूर्णत्त्वास जाऊन दलालांनी ही वास्तू व्यापली गेली आणि या मार्गाचं नावच दलाल स्ट्रीट पडलं. नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1957 च्या ऑगस्टमध्ये देशातील पहिलं स्टॉक एक्स्चेंज म्हणून उदयास आलं व सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्याखाली नोंदवलं गेलं. नंतर 1979 पर्यंत सध्याची बाँबे स्टॉक एक्स्चेंजची इमारत अस्तित्वात आलेली नव्हती, ज्याचं बांधकाम 1980 मध्ये पूर्ण झालं व लागलीच मूळ बीएसई टॉवरचं नाव बदलून फिरोझ जमशेदजी जीजीभॉय टॉवर्स असं ठेवलं गेलं. नंतर एक्स्चेंजनं बाजारातील कंपन्यांची एकत्रित कामगिरी मोजण्यासाठी बीएसई सेन्सेक्स हा मापक निर्देशांक चालू केला. त्यानंतर 1995 मध्ये बीएसईनं सीएमसी कंपनीनं बनवलेली संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक व्यवहार पद्धती अवलंबिली, ह्या संपूर्ण मोठ्या बदलासाठी केवळ 50 दिवसांचा कालावधी लागला. या ऑनलाइन प्रणालीला बाँबे ऑनलाइन ट्रेडिंग (इजङढ) संबोधलं जाऊ लागलं, ज्याची क्षमता 80 लक्ष ऑर्डर्स प्रति दिवस होती, आणि त्यामुळं बाँबे स्टॉक एक्स्चेंजमधील सट्टेबाजांचा आवाज कायमचा थंडावला. ऑनलाइन व्यवहारांसाठी सुरुवातीस बाँबे स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत झालेल्या प्रत्येक कंपनीस शेअर बाजारातील व्यवहारासाठी विशिष्ट कोड दिला गेला होता आणि सर्व कंपन्यांच्या कोडचे एक मोठे पुस्तक उपलब्ध होते, ज्यामध्ये अ पासून सुरू होऊन कंपन्यांच्या नावाप्रमाणे प्रत्येकाचे कोड दिलेले असायचे (उदा. रिलायन्स इंडस्ट्रीज – 500325).

सुरुवातीस सेन्सेक्सची गणन प्रक्रिया ही बाजार-भांडवलाच्या भारित पद्धतीनुसार केली गेली. परंतु सप्टेंबर 2003 पासून, सेन्सेक्सची गणनाप्रक्रिया फ्री-फ्लोट कॅपिटलायझेशन पद्धतीवर आधारित केली जाऊ लागली. फ्री-फ्लोट म्हणजे कंपनीच्या प्रवर्तकांच्या मालकीचे असलेले कंपनीचे शेअरसंख्या गृहीत धरली जात नाही. उदा. समजा एखाद्या कंपनीनं आपलं भाग-भांडवल (शेअर कॅपिटल) हे 10 लाख शेअर्स वाटून उभं केलेलं असेल आणि त्यातील सहा लाख शेअर्स हे जर प्रवर्तकांकडं असतील तर फ्री-फ्लोट भांडवल हे उर्वरीत चार लाख शेअर्स गुणिले त्याचा बाजारभाव असं मोजलं जातं.

ज्याप्रमाणं सेन्सेक्ससाठी 1978-79 हे आधार वर्ष गृहीत धरलं गेलं, त्याचप्रमाणं सेन्सेक्सचं मोजमाप करण्यासाठी सर्वांत उत्तम अशा 30 कंपन्या गृहीत धरल्या गेल्या आणि 1986 नंतर सेन्सेक्स अशा 30 कंपन्यांच्या जोरावर मार्गक्रमण करू लागला. अर्थातच वेळोवेळी सेन्सेक्सचं मूळ असलेल्या 30 कंपन्या त्यांच्या कामगिरीनुसार बदलल्या गेल्या. त्यानंतर एप्रिल 1992 मध्ये हर्षद मेहता स्कॅममुळं सेन्सेक्स सुमारे 13 टक्के पडला. पुढं राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई) स्थापन होऊन त्यावरदेखील व्यवहार सुरू झाले आणि सेन्सेक्सला बहीण आली, निफ्टी. तेव्हापासून हे दोघं हातात हात घालून चालत आहेत आणि काळावर मात करीत नवनवीन शिखरं पादाक्रांत करीतच आहेत. सेन्सेक्सच्या या प्रवासाचं सिंहावलोकन…

पहिल्या 10 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी 4539 कामकाजाचे दिवस, तर 10 हजार ते 20 हजारच्या प्रवासास 439 दिवस, पुढील 20 हजार ते 30 हजार या टप्प्यासाठी 1789 दिवस, त्यानंतरच्या सहस्त्र अंशांसाठी (30 हजार-40 हजार) 1042 दिवस आणि 40 हजार ते 50 हजार या तेजीसाठी केवळ 416 दिवसांचा कालावधी लागलेला आढळून येतो. हा असाच बाजाराचा कल राहिल्यास तीन लाखांचा टप्पादेखील पुढील दशकात आश्वासक वाटतो, गरज आहे त्यावर विश्वास ठेवायची आणि त्याप्रमाणं कृती करण्याची…

सुपर शेअर : बजाज-ऑटो

मागील आठवड्यातील शेवटचे दोन दिवस बाजार काहीसा नरम राहिला. कोरोनावर देशातील सर्वप्रथम लस बनवणार्‍या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या वृत्तानंतर लसीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याच्या शंकेनं बाजारात नफेखोरीमुळं पडझड झाली तर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार खाली राहिल्यानं शुक्रवारीदेखील भारतातील बाजारात विक्रीचाच दबाव राहिला. मात्र बजाज ऑटोचा शेअर 14 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवून मागील आठवड्यातील सुपर शेअर ठरला. तिसर्‍या तिमाहीत बजाज-ऑटोनं 23 टक्के वाढ दर्शवल्यानं ह्या कंपनीच्या शेअर्सचा भाव शेवटच्या दिवशी चढाच राहिला. मागील वर्षी याच तिमाहीच्या 1262 कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत कंपनीनं 1556 कोटी रुपये नफा दर्शवला आहे. त्याचप्रमाणं कंपनीनं आतापर्यंतची सर्वांत मोठी उलाढाल (नऊ हजार कोटी रुपये) देखील याच तिमाहीमध्ये नोंदवली आहे. कंपनी आपल्या इलेक्ट्रिक प्रकारातील चेतक स्कूटरच्या खरेदीसाठी नोंदणी पुन्हा सुरू करणार असून त्यासाठी मागील वर्षी प्रतिसाददेखील खूप असल्यानं पुढील काळातील कंपनीचा नफा चांगला राहील या आशेनं बाजारातील विश्लेषक यासाठी वरील भावाचे उद्दिष्ट बाळगून आहेत. एकाच दिवशी 10 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवल्यानं दैनिक आलेख तक्त्यावर हा शेअर नवीन क्षेत्रात प्रवेश करतो.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply