नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी खात्यालाही प्राधान्य देण्यात आले असून हमीभाव उत्पादीत मालाच्या दीडपट देण्याची तरतूद करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकर्यांच्या हिताचे बजेट असल्याचे सांगितले. महत्वाकांक्षी, आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर बजेट असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरोनाच्या संकटाचा आणि लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम यंदाच्या अर्थसंकल्पावर होऊ दिला नाही. आरोग्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, नाविन्यता संशोधन व विकास, मिनिमग गव्हर्नमेंट आणि मॅक्झीमम गव्हर्नंन्स या सहा सुत्रांवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय. विविध तरतुदींसह देशाच्या कृषी क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद 2013-14 च्या तुलनेत 5 पटींनी वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार असं म्हणणार्या लोकांची तोंडं बंद करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिली आहे. याशिवाय, स्वत: अर्थमंत्र्यांनी एमएसपीचे जे आकडे दिलेत, त्यावरुन एमएसपीबद्दल ओरडणार्या विरोधकांना आरसा दाखविण्याचे काम त्यांनी केले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम उद्योजक अशा सर्वच आघाड्यांवर देशाला एक नवीन गती देणारा हा अर्थसंकल्प आहे.
–आमदार आशिष शेलार, भाजप नेते
सामान्य, गरीब, दलित, मागासवर्गीय वर्गाचे हित लक्षात घेऊन आर्थिक बळ देणारा अर्थसंकल्प हा शेतकर्यांना व मजुरांना नवसंजीवनी देणारा आहे.
-रामदास आठवलेे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष