Breaking News

कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नाही

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली धोक्याची जाणीव

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नसल्याचा आरोप फडणवीस यांनी यात केला आहे. कोरोनामुळे झालेले अनेक मृत्यू नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळे झाल्याचे दाखवण्यात येत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबईत कोविड चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याबद्दल फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील एकूण चाचण्यांमध्ये 1 मे रोजी मुंबईतील प्रमाण 56 टक्के होते. 31 मे रोजी हेच प्रमाण 27 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. चाचण्यांची संख्या कमी झाली असताना कोरोनाबळींची संख्या मात्र झपाट्याने वाढतेय. राज्यात 27 मेपर्यंत एका दिवसातील मृतांची सर्वाधिक संख्या 105 होती. पुढच्या दोन दिवसांत ती 116वर पोहचली आणि 3 जून रोजी 122 मृत्यू होऊन नवा उच्चांक प्रस्थापित झाला. मुंबईमध्ये कोरोना बळींची संख्या कशी वाढत आहे याची आकडेवारीच त्यांनी दिली आहे.
सरकारी रेकॉर्डवर कोरोना बळींची संख्या दाखवली जात असली तरी अनेकांच्या मृत्यूपत्रातून ’कोरोना’ किंवा ’कोरोना संशयित’ हे शब्द वगळण्यात आले आहेत. मुंबईतील भांडूप आणि विलेपार्ले येथील मृतांचे दाखलेही फडणवीस यांनी दिले आहेत. मृत्यूचे कारण स्पष्ट नसलेल्या अशा लोकांच्या अंत्यसंस्काराला होणार्‍या गर्दीमुळे संसर्ग पसरण्याचा धोका आहे, अशी भीतीही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
निसर्ग वादळातून मुंबई वाचली तरी कोरोनाच्या वादळालाही तितक्याच गांभीर्याने घ्यावे लागेल. कोरोनाबळी स्पष्टपणे दर्शवले तरच संसर्गाचा पुढील धोका टाळता येईल. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. संसर्गाचा दर अधिक असतो तेव्हा नमुने तपासणी पूर्वीपेक्षा किमान दोन पटीने वाढवणे आवश्यक असते. मुंबईत मात्र ते 50 टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना मुंबईत केवळ साडेतीन ते चार हजार चाचण्याच होताहेत. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालणे आवश्यक आहे, असा टोलाही शेवटी फडणवीसांनी पत्रातून लगावला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply