Breaking News

माणगावात गावठी शेंगा वधारल्या; वाल 100 ते 120 रु., मूग 80 रु., चवळी 80 रु. किलो

माणगाव : प्रतिनिधी

लांबलेला व अवकाळी पाऊस यामुळे माणगाव तालुक्यात रब्बी हंगामातील विविध कडधान्ये तयार होण्यास उशीर झाला आहे.  पंधरा ते वीस दिवस उशिराने बाजारात दाखल झालेल्या वाल, मूग, चवळी इत्यादी शेंगाची विक्री सध्या माणगावच्या बाजारात जोरदारपणे होत आहे. माणगाव तालुक्यात रब्बी हंगामात वाल, मूग, चवळी इत्यादी कडधान्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी लांबलेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे कडधान्य शेतीची पेरणी उशिराने झाली होती. त्यामुळे  वाल, मूग, चवळीच्या शेंगा तयार होण्यासाठी सुमारे 15 ते 20 दिवसांचा उशीर झाला. मात्र गेल्या दोन ते चार दिवसांत ग्रामिण भागात तयार झालेल्या शेंगा विक्रीसाठी माणगाव शहरात येत असून, यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अत्यंत चवदार असलेल्या या शेंगा शिजवून किंवा भाजून पोपटी लावून खाण्यासाठी अनेक ग्राहक खरेदी करीत आहेत. वालाच्या शेंगांना विशेष मागणी असून गेल्या वर्षी 80 ते 100 रुपये प्रति किलोने मिळणार्‍या वालाच्या शेंगा या वर्षी महाग झाल्या असून 100 ते 120 रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत. पोपटीसाठी वालाच्या शेंगांना मागणी आहे. वाल तयार झाला नसल्याने अनेक पोपटीप्रिय ग्राहक घाटमाथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी उपयोगात आणत होते. आता बाजारात वालाच्या शेंगा उपलब्ध झाल्याने खवय्यांनी गावठी शेंगांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

शेंगा मागील वर्षीचे दर   यंदाचे दर

1) वाल    80  ते 100    100 ते 120

2) मूग     50 ते 60       70 ते 80

3) चवळी   40 ते 50       60 ते 80

या वर्षी वाल, मूग, चवळीच्या शेंगा तयार होण्यास उशीर झाला. आता शेंगा तयार झाल्या असून अजून चार ते पाच दिवसांनी त्या मोठ्या प्रमाणात मिळतील.

-सीता काटकर, शेंगाविक्रेती महिला, माणगाव

गावठी वालाच्या शेंगा अतिशय चवदार असतात. यावर्षी अवकाळीने शेंगा उशिराने विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र पोपटीसाठी तसेच शिजवून खाण्यासाठी वालाच्या शेंगा अतिशय  चवदार आहेत. त्यामुळे यांना मोठी मागणी आहे.

-सुमित मोंडे, चाकरमानी, मुंबई

Check Also

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी …

Leave a Reply