पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील बलाप येथील न्यू. डी. जी. फूड ऍग्रो कंपनी या राईसमिलमध्ये कर्नाटक राज्याच्या वितरण व्यवस्थेतील गहू व तांदूळ सापडले आहेत. पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 43लाख 97हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त पुरवठा कोकण विभाग आणि रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे तपासणी पथक तसेच पाली सुधागड तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने मंगळवारी (दि. 2) सायंकाळी सुधागड तालुक्यातील बलाप येथे असलेल्या न्यू. डी. जी. फूड ऍग्रो कंपनी या राईस मिलची तपासणी केली. त्यावेळी येथे कर्नाटक राज्याच्या वितरण व्यवस्थेतील गहू व तांदूळ आढळून आले. हे तांदूळ व गहू तसेच मालवाहून नेणारा ट्रक असा एकूण 43लाख 96हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बोराटे करीत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
1) तांदूळ 3147 पोती, किंमत 34 लाख 61 हजार 700 रुपये 2) गहू 135 पोती, एकूण किंमत 1 लाख 35 हजार 3) एक ट्रक किंमत आठ लाख
RamPrahar – The Panvel Daily Paper