पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शुक्रवारी (दि. 12) शिवजयंती उत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत केले. या वेळी माघी गणेश उत्सवदेखील साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी महापालिकेत सकाळी 11.30 वाजता महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती अध्यक्षा हेमलता म्हात्रे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका रूचिता लोंढे, नगरसेवक गणेश कडू, गोपाळ भगत, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, पनवेल शहर पोलीस निरीक्षक लांडगे, उपायुक्त विठ्ठल डाके, सहायक आयुक्त चंद्रशेखर खामकर, ज्येष्ठ नागरिक व समिती सदस्य उपस्थित होते. कोरानाचे संकट अजूनही पुर्णपणे संपले नाही. त्यामुळे यावर्षी 19 फेब्रुवारीला होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सुचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या असल्याची माहिती पनवेल पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळानी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन केले.
काय करण्यास मनाई?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शिवजयंती साजरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाइक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान, गाणे नाटक, असे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकारच्या सर्व सुचना बैठकीत देण्यात आल्या.
काय करण्यास परवानगी?
शिवप्रेमीनी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबिरे, समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यास शिवजयंती मंडळांनी प्राधान्य द्यावे. या वेळी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम जसे की मास्क, सॅनिटायझर वापरावे, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
दरवर्षी शिवजयंती मोठ्या स्वरुपात साजरी करतो. यावर्षी जास्तीत जास्त 100 व्यक्तींनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश आहे. मी पनवेलच्या नागरिकांना आवाहन करते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गर्दी करू नये. नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करूया.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर