नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका अद्याप संपलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोरोनामुक्त झाला आहे. इतर विभागामधील रुग्ण संख्याही कमी होऊ लागली आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नागरिकांमधील उदासीनताही वाढत आहे. नागरिकांकडून सुरक्षेसाठीच्या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई बाजार समिती, रेल्वे, बस व इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणीही मास्कचा वापर केला जात नाही. वारंवार हात धुण्याच्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. लक्षणे दिसल्यानंतरही अनेक जण चाचणी करीत नाहीत. यामुळे वेेळेत कोरोनाचे निदान होत नाही. उशिरा चाचणी केल्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व आयसीयूमधील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरातील 165 रुग्ण आयसीयूमध्ये असून 392 जणांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. तब्बल 60 जण व्हेंटिलेटर्सवर आहेत. शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून 799 रुग्ण उपचार घेत आहेत. यामधील 76 टक्के रुग्ण आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन विभागात उपचार घेत आहेत. जनरल वॉर्डमध्ये फक्त 182 जण उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, संपलेला नाही. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पूर्वीप्रमाणे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोनासह साथीचे अजारही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जोपर्यंत संपूर्ण नवी मुंबई कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत अवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे. नियमांचे पालन केले तर रुग्णसंख्या कमी करणे शक्य होईल.