Breaking News

प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन

नागपूर ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग धरला असून सूर्यासोबत समाजातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. अशात प्रबोधनाच्या चळवळीच्या रूपात उदयास आलेले पथनाट्य आज राजकीय पक्षांच्या प्रचाराचे साधन झाले आहे.

पथनाट्याबाबत लोकांमध्ये आकर्षण आहे. या आकर्षणाचा राजकीय लाभ उमेदवारांकडून उचलला जाणे सहाजिक आहे. एखाद्या उमेदवारांची जाहीर सभा किंवा प्रचार करताना लोकांचे लक्ष वेधून वातावरण निर्मितीसाठी पथनाट्य प्रभावी ठरत असल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांतर्फे प्रचारासाठी पथनाट्याचा वापर केला जात आहे. 2019च्या निवडणुकीत प्रचाराच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हेही अनुकूल ठरत आहे. पथनाट्य कला प्रबोधनासाठी उपयोगात येत असल्याने व्यावसायिकतेची बाब यात नव्हती. कधीतरी शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी काम केले तरच शासकीय अनुदान मिळणे तेवढाच काय तो भाग, मात्र या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी उपयोग होत असल्याने आर्थिक लाभही कलावंतांना मिळत आहे. पथनाट्याच्या एका ग्रुपमध्ये 12 ते 15 कलावंत सहभागी असतात. एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडे दोन ते तीन ग्रुप ठरविण्यात आले असून यात 40-45 कलावंतांना काम मिळाले आहे.

यात मानधन किंवा आर्थिक मिळकत किती ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. चित्रपट, मालिका व नाटकांच्या क्षेत्रात काम करणारे नचिकेत म्हैसाळकर यांना शहरातील एका बड्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पथनाट्य बसविण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यांनी सांगितले, महिनाभरापूर्वी याची तयारी करण्यात आली. यात प्रचारगीत तयार करण्यापासून संगीताचाही वापर करण्यात आला. पथनाट्यात पहिल्यांदा नृत्याचा समावेश करण्यात आला. कोणत्या पक्षासाठी काम करतो ही बाब गौण आहे, मात्र या माध्यमातून कलावंतांना रोजगार मिळाला असून हजारो नागरिकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली. अ‍ॅड. गौरव खोंड यांनी पथनाट्याचे लेखन, तर चारुदत्त जिचकार यांनी संगीत दिले आहे. पथनाट्याचे दोन-तीन ग्रुप या कलेतून संबंधित उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध उमेदवारांकडून पथनाट्य सादरीकरणाची ऑफर असल्याने नाट्यक्षेत्रातील कलावंतांची मागणी वाढली आहे.

उमेदवाराच्या प्रचारासाठी साजेसे नाटक लिहणे, ते कलावंतांसह बसविणे व संगीताच्या माध्यमातून सादर करणे याला वेळ लागत असल्याने अनेक उमेदवारांचा पथनाट्याद्वारे प्रचार करणे शक्य नाही, मात्र सध्यातरी नितीन गडकरी यांच्या प्रचारात पथनाट्याचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही आपापल्या परीने या कलेचा वापर प्रचारासाठी केला जात आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply