मुझफ्फरनगर ः वृत्तसंस्था : निवडणुकीचे रण तापले आहे. मतदान जवळ येतेय तसे राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढवताना दिसतात. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील बिजनौर लोकसभा मतदारसंघात एक मजेदार आणि विचार करायला लावणारा किस्सा घडला आहे. काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला. त्यानुसार बिर्याणीही दिली, पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात शनिवारी माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. प्रचार सभेनंतर दुपारी जेवण ठेवण्यात आले होते. समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती, पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी सांगितलं की, आचारसंहितेचे उल्लंघन आणि विविध कलमांखाली 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. गावात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Check Also
रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र
26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …