अलिबाग : प्रतिनिधी
अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. त्याचा भाव सध्या वधारला आहे. लहान कांदा 180रुपये माळ तर मोठा कांदा 200रुपये माळ या दराने सध्या विकला जात आहे.
अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढर्या कांद्याचे पिक जास्त प्रमाणावर घेतले जाते. मागील वर्षी 240हेक्टरवर पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी पांढर्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. यंदा केवळ अलिबाग तालुक्यात 223हेक्टर क्षेत्रावर पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा काही प्रमाणात कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. रोप कुजल्याने लागवडी खालील क्षेत्र घटले आहे.
सध्या पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. अगदी सुरवातीला 350रुपये दराने कांद्याची माळ विकली गेली. आता बाजारात आवक वाढल्याने लहान कांदा 180माळ व 720रूपये मण या दराने विकला जात आहे. मोठा कांदा 200रुपये माळ व 800 मण दराने विकला जात आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्यावर दर काही प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
औषधी गुणधर्म, रूचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्ये असलेल्या अलिबागच्या पांढर्या कांद्याची आवक बाजारत वाढली आहे. पांढरा कांदा मोठा भाव खात बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदा कांद्याचा भाव वाढला असला तरी मागणीदेखील वाढली आहे. भातापेक्षा चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांसाठी हा कांदा पांढरे सोने ठरत आहे.
वसई आणि नाशिक जिल्ह्यातही पांढर्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा इतर ठिकाणी होणार्या कांद्यापेक्षा वेगळा आहे. इतर जिल्ह्यांमध्ये होणारा पांढरा कांदा तिखट असतो. त्या तुलनेत अलिबाग तालुक्यात होणार पांढरा कांदा कमी तिखट असतो. काही ठिकाणी अलिबागचा कांदा सांगून इतर जिल्ह्यातील कांदा विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.
अलिबागचा कांदा लहान ते मध्यम आकाराचा असतो. त्याची माळ केलेली असते. आकाराने मोठा असलेला कांदा चवीला वेगळा असतो. ग्राहकांनी आकाराने लहान असलेला व माळ असलेला कांदा खरेदी कारावा, असे आवाहन कृषि विभाने कले आहे.