तीन वेगवगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी
पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. साहसिकच नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रवास केला. रस्ते वाहतुकीचे प्रमाण वाढले व रस्ते वाहतूकीमुळे होणारे अपघातही वाढले. पनवेल परिसरातही दररोज अपघात घडून अनेक नागरिक मरण पावतात. नुकत्याच परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू व दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
खारघर जवळील हिरानंदानी पूलाशेजारी कमलेश प्रसाद सिंग (वय 41) यांनी काही कारणासाठी वॅगेनार गाडी उभी ठेवली होती. या वेळी मुंबईकडून पनवेलच्या दिशेने जाणार्या भरधाव वेगातील ट्रकचालकाचे त्याच्या ताब्याील ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पूलावरील संरक्षण भिंतीवरून खाली उभ्या असलेल्या वॅगेनार कारवर जोरदारपणे जाऊन आदळला. यात सिंग हे गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू पावले आहेत. तर याप्रकरणी ट्रकचालक संजय खराडे याला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसर्या घटनेत तालुक्यातील पेंधर गाव येथून मोटरसायकलीवरून सुरेश कोळी (वय 59) व धर्मा पाटील (वय 58) हे मोरावे येथे जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरने त्यांच्या मोटरसायकलीस धडक दिली. या झालेल्या अपघातात धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला आहे., तर सुरेश कोळी हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तिसर्या घटनेत पनवेलजवळील गावदेवी मंदिराजवळ जेएनपीटी ते पळस्पे रोडवर पादचारी मधुकर विखारे (वय 75) यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने ठोकर दिली. झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहेत. या अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात कऱण्यात आली असून पसार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी सूचना
रस्ते अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत असते, परंतु काही वाहनचालकांचा हलगर्जीपणा, बेफिकीरी तसेच कामाच्या ठिकाणी पोहचण्याची घाई यामुळे बरेचदा अपघात झालेले पहावयास मिळतात. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर होणारे अपघात टाळता येतील, असे वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी सांगितले जाते.