Breaking News

दुर्गंधीयुक्त वायू सोडणार्या तळोजा येथील कंपन्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर – तळोजा औद्योगिक क्षेत्रात असणार्‍या विविधप्रकारच्या मच्छी कंपन्यांच्या कचर्‍यापासून पावडर बनवली जाते. त्या कंपनीच्या धुरांड्यातून निघणार्‍या वायू व दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांसह येथील कामगारवर्गाचे आरोग्य धोक्यात आले असून सदर कंपन्यांविरुद्ध प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता सर्दी, खोकला, ताप आला की आपल्याला कोरोना तर झाला नाही ना अशी भीती नागरिकांमध्ये पसरत आहे. त्यामुळे नागरिक आपली आणि आपल्या कुटुंबाची या सरकारने सांगितलेल्या नियमांप्रमाणे खबरदारी घेत आहेत. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या काही मच्छी कंपन्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना, लहान मुलांना, वृद्धांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या दुर्गंधीचा परिणाम त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरत असून सर्दी खोकला घसा खवखवणे आणि लहान मुलांना या दुर्गंधीमुळे उलटी होणे असा प्रकार घडत आहे. काही महिन्यापूर्वी या कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बंद करण्यात देखील आल्या होत्या पण पुन्हा या कारखान्यांना त्यांच्या अटी शर्तींवर चालू करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. पण दिलेल्या अटी शर्ती ह्या मात्र कागदावरच का? असा सवाल येथील असणारी स्थानिक जनता करत आहे आणि ग्रामस्थांकडून या बाबत तक्रारी केल्या असल्या तरी कारवाई करण्यासाठी का विलंब होत आहे.

तसेच अशा कारखान्यांवर रायगड पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीदेखील काही महिन्यांपूर्वी या कंपन्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरीदेखील या कंपन्या कोणत्या अधिकार्‍यांना जुमानत नाही का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply