Breaking News

पोलादपूर नगरपंचायतीच्या सीमा आकसणार?

तालुक्याचे गाव असलेल्या पोलादपूर ग्रामपंचायतीला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगरपंचायत घोषित करून तहसीलदारांना  प्रशासक नियुक्त केले आहे, मात्र नगरपंचायतीच्या रचनेमध्ये सीमा विस्तारण्याऐवजी आकसण्याचा धोका महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत जुलै 2005च्या पूरस्थिती पुनर्वसनामुळे निर्माण झाला आहे.

पोलादपूर ग्रामपंचायत पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, मात्र तिचे विभाजन होऊन चरई आणि काटेतळी या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या, तर रानबाजिरे गाव कापडे बुद्रुक आणि चोळई गाव सडवली ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. दरम्यान, नव्याने केवळ ग्रामपंचायत स्वरूपातील पोलादपूर गावांमध्ये तांबडभुवन, लेप्रसी हॉस्पिटल, जोगेश्वरी गाडीतळ, गोवळकोंड, सावंतकोंड, पार्टेकोंड, कुंभारआळी, बौध्दवाडी, हुतात्मा भाई कोतवाल मार्ग, परिटआळी, बाजारपेठ, मठगल्ली, वरचा मोहल्ला, एसटी स्टॅण्ड, खालचा मोहल्ला एवढेच लोकवस्तीचे पारंपरिक क्षेत्र होते. ग्रामपंचायत पोलादपूरच्या विस्तारानंतर लोकवस्तीत वाढ होऊन लेप्रसी मिशन हॉस्पिटल, आदिवासीवाडी, गाडीतळ, तहसील कार्यालय, पोलीस लाईन, गणेशनगर, तांबडभुवन, घाटेआवाड, सैनिकनगर, गोकूळनगर, जाखमातानगर, प्रभातनगर (पश्चिमेकडील), हनुमाननगर, सावंतकोंड, पार्टेकोंड, उंबरकोंड, प्रभातनगर (पूर्वेकडील), रोहिदासनगर, बौध्दवाडी, सावित्रीनगर, भैरवनाथनगर, सिध्देश्वरनगर (उत्तरेकडील), वरची बाजारपेठ, आनंदनगर, खालची बाजारपेठ, मठगल्ली, वरचा मोहल्ला, एसटी स्टॅण्ड, सिध्देश्वरआळी (दक्षिणेकडील), खालचा मोहल्ला, शिवाजीनगर आदी लोकवस्त्यांचा समावेश करण्यात आला.

बरखास्त झालेल्या पोलादपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सिटीसर्व्हे प्रॉपर्टीकार्डस् आणि महसूली सातबारा उतारे दोन्ही यंत्रणा अस्तित्वात असून दोन्हींमध्ये कमालीची विसंगती आढळून येत आहे. महसूली सातबारा उतारा असलेल्या जमिनींवर सिटीसर्व्हेच्या प्रॉपर्टीकार्डावरील बेकायदेशीर कब्जादेखील अधिकृत आहे अथवा कसे याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. पोलादपूर शहरात सध्या मोकळ्या खासगी मालकीच्या जमिनी असलेले केवळ दोन-तीन मोठे परिवार आहेत तर  शिवाजीनगरच्या गावठाणासाठी खासगी जमीनमालकांकडून संपादित केलेल्या जमिनीपैकी एक मोठा सरकारी भूखंड एका परिवाराच्या ताब्यात अनधिकृतरित्या आहे. दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलकडे स्थानिकांनी दान केलेल्या जमिनीचे क्षेत्र फार मोठे असून या जमिनीवर मिशनरींचा कब्जा असल्याने या जमिनींचा फेरफार उतारा काढून सदर जमिनींचा दान करतेवेळीचा हेतू संपल्यामुळे मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची अथवा सर्व जमीन सरकारी गावठाण म्हणून सरकारजमा होण्याची गरज आहे. याच नियमाने शिवाजीनगरच्या सरकारी गावठाणावरील कब्जा दूर करून सदर जमिनींचा संपादन करतेवेळीचा हेतू साध्य न झाल्यामुळे मूळ जमीन मालकांकडे त्या जमिनींचा ताबा देण्यात येण्याची गरज आहे अथवा कब्जा हटवून सरकारी गावठाण म्हणून हे क्षेत्र घोषित होण्याची गरज आहे. नव्याने इमारती होण्यासाठी तसेच वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी येथे कोणताही भूखंड शिल्लक नाही.

नियोजित पोलादपूर नगरपंचायतीमध्ये अग्निशमन व्यवस्था, नळपाणीयोजना, रस्तेस्वच्छता व रस्त्यावरील विद्युतरोषणाई, डम्पिंग ग्राऊंड, फूटपाथ, नागरी वाहतूक व्यवस्था, शहरातील रस्ते अशा सुविधांसह नगर वाचनालय, नगरसभागृह, नाट्य व चित्रपटगृह, इमारतींना तिसरा मजला बांधण्याची परवानगी अशा अनेक सुविधा उपलब्ध होण्यासाठी तरतूद असेल. मात्र, मायक्रो टाऊन प्लॅनिंगची आवश्यकता असल्याने अंतर्गत रस्ते आणि छोटीमोठी खासगी तसेच सरकारी जमिनीवरील बेकायदा तसेच विनापरवाना बांधकामे हटविण्यासाठी सरकारी यंत्रणेला मोठ्या प्रमाणात आव्हान आहे.

पोलादपूर शहरातील अनेक जमिनींचे व्यवहार कागदोपत्री रक्कमेखेरिज ’ऑन मनी’ घेऊन सरकारी नोंदणी कर बुडविण्याच्या सातत्यपूर्ण घटनांमुळे शहरातील जमिनींचा सरकारी प्रतिगुंठा दर ’रेडीरेक्नर’ फारच कमी झाला असून मोकळ्या जमिनींचे क्षेत्रदेखील घटले आहे. जुन्या बाजारपेठेत पूररेषेखालील सावित्री नदीपात्रात, सैनिकनगरमध्ये डोंगरउतारावर, आनंदनगरमध्ये अन्य मालकांच्या जमिनीवर तर शिवाजीनगरमध्ये सरकारी भूखंडांवर बेकायदेशीररित्या अतिक्रमणे करून इमारती बांधण्यात आल्याने या बांधकामांना नियमित करून घेण्यात तसेच अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात सरकारी यंत्रणेला विशेषाधिकार वापरावे लागणार आहेत.

सध्या पोलादपूर शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून स्थानिकांची मध्यरेषेपासून दूतर्फा समान भूसंपादनासह 45 मीटरची मागणी आहे. यामुळे तांबडभुवन, घाटे आवाड, पंचायत समिती कार्यालय, तसेच त्यासमोरील लोकवस्ती बाधित होणार आहे. अशातच, महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयाने 25 व 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान सावित्री नदीला आलेल्या महापुरामध्ये बाधित झालेल्या सिध्देश्वर आळी, खालची बाजारपेठ आणि सावित्रीनगर अशा लोकवस्तीतील 31 घरे आणि 52 कुटूंबांचा पुनर्वसनासाठी प्रस्ताव केला आहे. त्यानुसार अशा प्रस्तावित कुटूंबांच्या घरांना स्थलांतरीत करण्यात येणार असून पूररेषेखालील क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तीनंतरही वास्तव्यास असलेली ही कुटूंबे प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर वास्तव्य करू शकणार नाहीत. परिणामी, पोलादपूर नगरपंचायतीची घोषणा होऊन रचना झाल्यानंतर सीमा विस्तार होण्याची अपेक्षा असताना एकीकडे महामार्गालगतच्या लोकवस्तीला तर दुसरीकडे सावित्री नदीपात्रालगतच्या लोकवस्तीला स्थलांतरीत होण्याची वेळ ओढवून नगरपंचायतीच्या सीमा आकसणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply